रक्तक्षय (Anemia)

आपण आजारी पडूच नये असे सर्वांना वाटते. कारण आजारपण आपल्या सर्व बेतांवर पाणी फिरवते. म्हणून आजाराला दूर ठेवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आरोग्याचं रक्षण करणाऱ्या शिपायांची ओळख करून घ्यायला हवी.

हिमोग्लोबिन

या शिपायांपैकी एक म्हणजे हिमोग्लोबिन. हा रक्त पेशीतील एक घटक आहे. तो प्रथिने आणि लोह यांपासून बनतो. रक्ताची लाली हिमोग्लोबिनमुळे असते. हाच घटक शरीरातील सर्व पेशींना प्राणवायूचा पुरवठा करतो. हिमोग्लोबिनचे कार्य सतत होत राहण्यासाठी त्याची शरीरातील मात्रा किमान पातळीवर असायलाच हवी. मुलींमधे ती १२० ग्रॅम प्रति लिटर (१२ ग्रॅम प्रति डेसिलिटर)आणि मुलांमधे १३८ ग्रॅम प्रति लिटर (१३.८ प्रति डेसिलिटर) इतकी असावी लागते. रक्त तपासणी अहवालात हे 12 gm % (किंवा 13.8 gm %) असे दर्शविले जाते.

जर हे प्रमाण कमी असेल तर शरीराला प्राणवायूचा पुरवठा कमी होईल. यालाच रक्तक्षय किंवा anemia असे म्हणतात. मग थकणे, डोके दुखणे, केस गळणे, अभ्यासात किंवा कामात लक्ष न लागणे, दम लागणे, शरीराला सूज येणे अशा गोष्टी होतात. शिवाय प्रतिकारशक्ती कमी होऊन वारंवार आजारी पडणे आलेच. यावर उपाय काय ?

रक्तक्षयावरील उपाय

योग्य आहार आणि औषधांनी आपण यावर मात करू शकतो. बहुतेक वेळा आहारातील लोहाच्या कमतरते मुळे शरीराला हिमोग्लोबिनची निर्मिती करता येत नाही. पेशींना प्राणवायूची कमतरता पडल्याने वर सांगितलेली लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणूनः-

  • आहारात जास्तित जास्त लोह युक्त पालेभाज्या, खजूर, गूळ, बीट, मांसाहार इत्यादींचा समावेश करावा. म्हणजेच प्रत्येक जेवणात वाटीभर भाजी व कोशिंबीर खावी. आवडत असल्यास मांसाहार वाढवावा.
  • “क” जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन C शरीराला योग्य त्या प्रमाणात दिल्यामुळे लोह आतड्यात अधिक प्रमाणात शोषले जाते. म्हणून प्रत्येक जेवणात आंबट पदार्थांचा समावेश असावा. उदा. आवळा, चिंच, लिंबू, आमसूल वगैरे.
  • चहातील घटकांमुळे लोहसत्व शरीरात कमी प्रमाणात शोषले जाते म्हणून जेवणाआधी चहा घेऊ नये.
  • आपण कितीही आटापिटा केला तरी आपल्या जेवणातील फक्त १० टक्के लोहच शरीरात शोषले जाते. म्हणून अँनिमिया झाल्यास औषधे घेणे अनिवार्य ठरते. रक्तवाढीच्या म्हणजे लोहाच्या गोळ्या जेवणानंतर एक ते दीड तासानी डॉक्टरांच्या सल्ल्याने पाच महिने घेतल्या पाहिजेत.
    या उपायांनंतरच या आजाराला दूर ठेवता येईल.

भारतातील स्थिती

नुकत्याच केलेल्या पाहणीत असे आढळले आहे की भारतात जवळजवळ ५० टक्के स्त्रियांना आणि मुलींना अँनिमिया आहे. म्हणजे आपल्या बहिणीं, मैत्रिणीं, आया, लेकींपैकी प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला हा आजार आहे. म्हणजेच भारताच्या सुमारे २५ टक्के लोकसंख्येला हा आजार आहे.

सरकारनेही या आजारा विरोधात पावले उचलून आजाराच्या चाचण्या आणि औषधे सर्व सरकारी दवाखान्यांमधे मोफत उपलब्ध करून दिली आहेत. या साऱ्यांचा फायदा घेऊनच अँनिमियावर मात करता येईल.

–डॉ.सौ.आश्लेषा दांडेकर