दिनांक २६, २७ व २८ रोजी विज्ञान केंद्राच्या वतीने सौर विद्युत ऊर्जा या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. त्यात १० व्यक्तींनी भाग घेतला. श्री. प्रसाद मेहेंदळे आणि श्री. अभिजीत सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
स्वतःच्या घरी बसवण्यासाठी किंवा इतरांकडे हे सौर पॅनेल बसवून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी पुढील पद्धत अवलंबावीः-
- घरातील, विजेवर चालणाऱ्या कोणत्या वस्तू आपल्याला सौर ऊर्जेवर चालवायच्या आहेत यांची यादी करा. उदा. पंखा, दिवा, रेडिओ, फ्रिज, टीव्ही इत्यादी.
- या प्रत्येक वस्तूला किती विद्युत शक्तीची (विद्युत शक्ती वॉटमधे मोजली जाते) गरज असते ते माहिती करून घ्या.
- ही प्रत्येक वस्तू एका दिवसात (२४ तासात) किती वेळ वापरली जाते त्याची नोंद करा.
- ऊर्जा = शक्ती X वेळ (तासात) हे सूत्र वापरून प्रत्येक वस्तूला आवश्यक अशा ऊर्जेची नोंद करा. उदा. एक दिवा १० वॉटचा आहे आणि तो दिवसा ४ तास वापरला जात असेल तर त्याला ४० वॉट तास (अवर) इतक्या ऊर्जेची गरज एका दिवसात भासते.
- अशा सर्व ऊर्जांची बेरीज करा. ती वॉट तास या एककात असेल.
- ही ऊर्जा आपण सौर पॅनेल वापरून दिवसभरात जमा करणार आहोत. त्यासाठी सूर्य पूर्ण तीव्रतेने फक्त चारच तास उपलब्ध असेल असे गृहीत धरले तर पुढे ऊर्जा कमी पडत नाही. आपल्या सर्व उपकरणांना एका दिवसात लागणारी ऊर्जा जर ३०० वॉट-तास इतकी असेल आणि ती दिवसा चार तासात जमा करायची असेल तर त्यासाठी ३०० वॉट-तास भागिले ४तास म्हणजे ७५ वॉटचे पॅनेल वापरावे लागेल.
- हे पॅनेल १५ व्होल्ट व सुमारे ५ अँपियर प्रवाह वापरून तुमची बॅटरी चार्ज करते. त्यामुळे विद्युत मंडलात वाया जाणाऱ्या ऊर्जेचा विचार करता, १२ व्होल्ट २५ अँपियर तास इतक्या बॅटरीची निवड करणे योग्य ठरते. बाजारात उपलब्ध असणारी या क्षमतेची किंवा त्याच्या पेक्षा थोडी जास्त क्षमता असणारी बॅटरी आपल्यासाठी निवडा.
- तुम्ही जर इन्व्हर्टर बसवणार असाल तर (इन्व्हर्टरमधे वाया जाणाऱ्या ऊर्जेवरील उपाय म्हणून) वरील गणिताने आलेल्या क्षमतेपेक्षा सुमारे ३० टक्के जास्त क्षमतेचा विचार करा.
वरील पद्धत व या विषयातील इतर कोणत्याही शंका व प्रश्नोत्तरांसाठी पुढे जागा ठेवली आहे. त्याचा वापर सदस्य करू शकतील. सदस्य नसणाऱ्यांपैकी कोणाला शंका विचारायची असेल तर सदस्य होण्यासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.