जीवामृताचे प्रयोग

प्रा.ड़ॉ. अविनाश दांडेकर महाराष्ट्रातील एका कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्यांनी केलेल्या जीवामृतासंबंधीच्या प्रयोगाची माहिती त्यांनी  विज्ञान केंद्रासाठी पाठवली आहे. घर तेथे भाजीबाग या विज्ञान केंद्राच्या प्रकल्पासाठी ही माहिती उपयुक्त आहे. त्यातील गायीचे शेण व मूत्र या ऐवजी जैव वायु संयंत्रातून बाहेर येणारी स्लरी देखील वापरता येऊ शकते. डॉ. दांडेकर यांनी स्वतःच प्रयोग करून तसा अनुभव घेतला आहे.

जीवामृत कसे बनवाल ?

  • ४० किलो गायीचे शेण (शक्यतो ताजे)
  • ४० किलो गो मूत्र
  • २ किलो बेसन
  • २ किलो काळा गूळ
  • ज्या झाडाजवळ माणसाचा संपर्क नाही अशा झाडाच्या मुळा जवळील १ किलो माती.

वरील सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून एकजीव मिश्रण केले  व २२ दिवस फसफसण्यासाठी ठेवले. रोज तिनदा ते ढवळले. मिश्रण सावलीत झाकून ठेवले.

२२ दिवसांनंतर १ः२० या प्रमाणात पाणी मिसळून (एक लीटर जीवामृतात २० लीटर पाणी) हरितगृहातील गुलाबास दिले. त्यानंतर पुढील प्रयोग केले.

प्रयोग १

हे जीवामृती बोर्डो व फर्स्ट रेड या गुलाबांच्या जातीला दर दहा दिवसांनी एकदा असे दोन महिने दिले. त्यावेळी पाने,  कळ्या खोडाची जाडी व लांबी या सर्वांत नाट्यमयरित्या वाढ झालेली आढळली. मात्र जीवामृत देण्याच्या दिवशी वा पुढील दिवशी रासायनिक खत न देण्याची काळजी घेतली.

जैविक व रासायनिक खतांच्या वार्षिक खर्चात मोठी कपात झाल्याचे ध्यानात आले.

प्रयोग २

टॉप सीक्रेट या गुलाबाच्या जातीसाठी जीवामृत खत म्हणून ३ महिने वापरले. या वेळी कोणत्याही इतर रासायनिक खताचा वापर केला नाही. या प्रयोगात तीन महिन्यांत एकूण बारा वेळा (१ आठवड्याच्या अंतराने) जीवामृत गुलाबाला दिले. विशेषतः उन्हाळ्यात उच्च तापमान असताना जीवामृताचा परिणाम तपासला. तापमान जास्त असूनही कळीचा आकार मोठाच राहिला. रासायनिक खते न वापरण्याचा परिणाम जाणवला नाही. पानाचा आकार खूपच मोठा होता. खोडाची लांबी व जाडी रासायनिक खत वापराच्या तुलनेत मोठी होती. मातीच्या पोतात व रचनेत मोठा बदल आढळून आला.

प्रयोग ३

१५०० चौ मीटर क्षेत्रावरील गुलाबांवर चुकीच्या औषधाची फवारणी झाली होती. त्यामुळे हे क्षेत्र दूषित झाले होते. नेहमीचा उपाय म्हणून सर्व गुलाबाची रोपे उपटून काढणे गरजेचे ठरते कारण अशा रोपांना फुले येत नाहीत. ह्यूमिक अॅसिड व इतर अनेक जैविक रसायने वापरून पाहिली पण उपयोग झाला नाही.

पण जीवामृताचा वापर आठवड्यातून दोनदा  असा सतत दोन महिने केला. ठिबक सिंचनानेच पाणी दिले व कोणताही रासायनिक फवारा मारला नाही. दोन महिन्यांनंतर सर्व रोपे ठिकठाक झाली चांगल्या दर्जाची फुले त्यांना आली. हे पीक अजूनही उत्तम उत्पादन देत आहे.

जीवामृताची किंमत

हरितगृहात वाढवलेल्या गुलांबासाठी प्रति दिन प्रति एकरी १००० रुपये रासायनिक खतासाठी जातात. म्हणजे एकूण २५ दिवस खत दिल्यास खर्च २५००० रु. येतो.
दर दहा दिवसांनी एकदा जीवामृत द्यायचे झाल्यास प्रत्येक वेळी १५०० रु. खर्च येतो. अशा रीतीने दोन महिन्यात ६ वेळा खत देणे (रु. ६०००) आपण वाचवू शकतो. जीवामृत वापरून कमी खर्चात उत्तम गुणवत्तेचे उत्पादन आपल्याला मिळते. शिवाय जमिनीची हानी होत नाही हा भाग फार महत्वाचा.

%d bloggers like this: