ओला कचरा- समस्या आणि उत्तर

डॉ.संजीव कुलकर्णी हे सूक्ष्मजीवशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्राचे तज्ञ आहेत. त्यांचा हा लेख वाचकांना नुसता माहितीपरच नव्हे तर बोधप्रद ठरावा. या विषयावर वाचकांपैकी कोणी गंभीरपणे कृती केली असेल तर विज्ञान केंद्राशी जरूर संपर्क साधा.

 

सद्यस्थिती

कचऱ्याची समस्या या विषयावर उदंड बोलले आणि लिहिले जाते. पुणे महानगरपालिकेने ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण करण्यासाठी केलेली तथाकथित सक्ती आणि तिचा सामान्य नागरिकांनी उडवलेला फज्जा, ओला कचरा जागेवरच जिरवणारा प्रकल्प उभारणाऱ्या सहकारी गृहसंस्थांना महानगरपालिकेने देऊ केलेली करसवलत आणि ही सवलत मिळवण्यासाठी नागरिकांनी तात्पुरते केलेली काही नाटके आणि ती सवलत मिळाल्यावर निर्लज्जपणाने त्या प्रकल्पांकडे केलेले दुर्लक्ष…. एकंदर सगळे शिरस्त्याप्रमाणेच चालले आहे म्हणायला हरकत नाही. हे झाले फक्त पुण्याचे. इतरत्रही गावांतही प्रवेश करतानाच असह्य दुर्गंधीचे कचराडेपो, गावागावांत ओसंडून वाहाणाऱ्या कचराकुंड्या, माशा, डास यांचा उपद्रव, आसपास फिरणारी भटकी कुत्री हे सामान्य चित्र दिसते. यावर स्थानिक प्रशासनाला शिव्या घालत नाकावर रुमाल धरून हा त्रास सहन करणारा नागरिक स्वतःच्या घरातला कचरा बाकी बिनदिक्कत रस्त्यावर फेकायलाही कचरत नाही. या सामाजिक अनास्थेच्या सुमारसद्दीत अपवादानेच आपल्या घरातला, कार्यालयातला, सहकारी गृहसंस्थांमधला आणि कारखान्यातलासुद्धा संपूर्ण ओला कचरा त्या त्या जागी जिरवून आपापल्या परीने पर्यावरणाच्या संवर्धनाला हात लावणारे काही लोक दिसतात. अशा कचरा व्यवस्थापनातून उत्तम खताची निर्मिती करून त्यावर आपल्या परसातली, गच्चीतली बाग फुलवणारे लोकही दिसतात. पण हे प्रमाण नियम सिद्ध व्हावा इतके अपवादात्मक आहे. बाकी जनता ‘हे आपल्याशी संबंध नसलेले काहीतरी आहे… ‘ अशा बेफिकीर मग्रूरीत असलेली दिसते.

कचऱ्याचा प्रश्न

या कचराव्यवस्थापनातील नेमके तथ्य काय आहे? ओला कचरा म्हणजे काय , तो जागेवर जिरवणे म्हणजे काय, त्यातून खत निर्मिती कशी होते आणि त्यावर परसबागा, फुलबागा कशा फुलू शकतात आणि काही मर्यादित प्रमाणात का होईना, रोजगारनिर्मिती कशी होऊ शकते यावर प्रकाश टाकावा म्हणून हा लेखनप्रपंच. घन कचऱ्याचे सेंद्रीय व असेंद्रीय असे ढोबळ वर्गीकरण करता येईल. असेंद्रीय कचऱ्यात काच, धातू व प्लास्टिक या सहजासहजी विघटन न होणाऱ्या पदार्थांचा समावेश आहे. हे सोडून बाकी सगळे – म्हणजे ज्याचे नैसर्गिक पद्धतीने विघटन होते ते पदार्थ- उदा. कागद, सुती कापड,भाजीपाल्याची टरफले व देठे, उरलेले शिळे अन्न, अंड्यांची टरफले हा सगळा सेद्रीय कचरा आहे. निसर्गात विविध प्रकारचे जीवाणू या कचऱ्याचा अन्न म्हणून वापर करतात आणि त्यापासून उर्जा मिळवतात. या कचऱ्याचे संपूर्ण विघटन झाले की बहुतेक वेळा पाणी आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतात. निसर्गात ही प्रक्रिया अत्यंत संथपणे पण सतत सुरू असते. या अर्थाने हे विघटन करणारे जीवाणू आपल्याला केवढी मदत करत असतात ते पहा! या विघटनातला एक मधला टप्पा म्हणजे अर्धवट विघटन पावलेले पण पूर्ण कुजलेले सेंद्रीय पदार्थ ( ज्याला स्थूलमानाने ह्यूमस असे म्हणता येईल.) या ह्यूमसचे जमीनीतील प्रमाण वाढले की जमीनीची सुपीकता ही वाढते. घनदाट अरण्यातील वृक्षवेलींचा पालापाचोळा, प्राण्यांची, कीटकांची मृत शरीरे, आणि त्यांची विष्ठा यांचे वर्षानुवर्षे होणारे विघटन यामुळे अरण्यातील जमीनी अधिकाधिक सुपीक बनवत जातात. तथापि, मोठ्या शहरातील दाट लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण इतके प्रचंड आहे, की त्यापुढे निसर्गाची ही पुनर्निर्माण करणारी व्यवस्था अपुरी पडते, कोलमडूनच जाते. अशा कचऱ्याचे ढीग साठत गेले की या जीवाणूंना विघटनासाठी लागणारा ऑक्सीजन त्या ढीगांमध्ये खोलवर उपलब्ध होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत ऑक्सीजनच्या अभावामध्ये काम करणारे जीवाणू (अनएरोबिक ऑरगॅनिझम्स) वाढीस लागतात. हे ही जीवाणू विघटनाचे कार्य करतात खरे, पण ते या सेंद्रीय कचऱ्याचे पूर्ण विघटन करू शकत नाहीत. व या अर्धवट कुजलेल्या कचऱ्यापासून दुर्गंधीयुक्त पदार्थांची निर्मिती होते. ( उदा. हायड्रोजन सल्फाईड). मग माशा, किडे, डास हे दुष्टचक्र सुरू होते.

आता उत्तर

हे झाले या प्रश्नाचे स्वरुप. आता उत्तराकडे. मुळात घन कचऱ्याची निर्मिती कशी कमी करता येईल, याचा जरी प्रत्येकाने जाणीवपूर्वक विचार केला, तरी हा प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकेल. या साठी प्रसिद्ध अशी ‘आर’ ची त्रिसूत्री – रिड्यूस, रियूज, रिसायकल – समजून घेणे आवश्यक आहे. कागदाचे साधे उदाहरण घेऊ. पाठकोरे कागद वापरणे हे काही अनाकलनीय कारणामुळे कमी प्रतिष्ठेचे समजले जाते. अगदी स्वतःचा इ-मेल पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक जरी कुणाला द्यायचा असेल, तरी नवाकोरा, मोठा कागद घेणारे लोक पदोपदी दिसतात. वापरला जाणारा प्रत्येक नवीन कागद हा कुठेतरी, कुणीतरी, कुठल्यातरी वृक्षावर घातलेला घाव असतो, ही जाणीव प्रत्येकापर्यंत जाणे गरजेचे आहे. कागदाचा कमीत कमी वापर करणे, शक्य तितका पुनर्वापर करणे, प्लास्टीकचा वापर जाणीवपूर्वक टाळणे असे अनेक मार्ग सातत्याने प्रसारमाध्यमांतून सुचवले जात असतात. जाणीवपूर्वक आपली जीवनशैली पर्यावरणरक्षणाशी सुसंगत करणे हा यातला कळीचा मुद्दा आहे. कचऱ्याची निर्मिती कमी करणे हा कचरा व्यवस्थापनातला पहिला आणि महत्वाचा भाग झाला. नुसता कागदच नव्हे, तर जे जे विघटनशील आहे, त्याची नासाडी कमी कणे गरजेचे आहे. या संदर्भात वाया जाणारे अन्न याबाबत चार शब्द लिहिणे आवश्यक आहे. नुसतीच लग्नाकार्यात नव्हे, तर रोजच्या जेवणातही अन्न वाया घालवणे हा अत्यंत गंभीर सामाजिक गुन्हा आहे अशी जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. खानावळीत वाट्यानवाट्या भाज्या, उसळी, आमट्या आणि कोशिंबिरी पानात टाकून उठणारे लोक, पोळीचा मधलाच भाग खाणारे लोक, कांदा, लिंबू वगैरे गरज नसताना मागून घेणारे व ते पानात टाकणारे लोक हे सामाजिक गुन्हेगार आहेत अशी भावना विकसित झाली पाहिजे.

(या बाबतीत शिक्षणासाठी होस्टेलल्या राहिलेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव जाणून घेण्यासारखा आहे. होस्टेलला राहाणे आणि मेसला जेवणे यांमुळे अन्नाबद्दलचा आदर वाढीस लागतो असा स्वानुभव आहे!) कागदाचा प्रत्येक कपटा निसर्गावर एक लहानसे ओझे टाकतो. विल्हेवाट करण्याचे ओझे. असे किती ओझे निसर्ग सहन करू शकेल? निसर्ग क्षमाशील आहे, पण तोही सर्वशक्तिमान नाही. निसर्गालाही मर्यादा आहेत. या मर्यादा तर आपण आधीच ओलांडल्या आहेत. त्यामुळे आपण कचरा करत जावा आणि निसर्गाने त्याची विल्हेवाट लावत राहावी, ही शक्यता पूर्णपणे मावळली आहे. जी गोष्ट कागदाची, तिच इतर सेंद्रीय पदार्थांची. म्हणून जिथे जिथे शक्य आहे, तिथे सेंद्रीय पदार्थांचा पुनर्वापर करण्याची प्रवृत्ती एक सामाजिक जाणीव म्हणून वाढीस लागली पाहिजे. जेंव्हा हे अगदीच अशक्य असेल, तेंव्हा हे पदार्थ योग्य पद्धतीने निसर्गात कसे मुरवता येतील, हे पाहिले पाहिजे. शेतीमध्ये तयार होणारे टाकाऊ सेंद्रीय पदार्थ कुजवून त्यापासून सेंद्रीय खत- कांपोस्ट- तयार करण्याची कला शतकानुशतकापासून शेतकऱ्यांना ठाऊक आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने विशेषतः काही निवडक जीवाणू आणि बुरशी यांचा वापर करून ही क्रिया अधिक वेगाने व अधिक फायदेशीर रित्या करता येते. यालाच आता व्हर्मीकांपोस्टिंगचे – गांडूळखताचे – नवीन परिमाण मिळाले आहे. गांडुळखत म्हणजे काय आणि गांडुळांचा वापर करून सेंद्रीय कचऱ्याचे विघटन कसे करता येईल ते पुढच्या भागात पाहू.

गांडूळ शेतकऱ्याचा मित्र

‘गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे’ हे वाक्य वाचून आणि विसरून बरीच वर्षे झाली. गांडुळांमुळे शेतजमिनीची मशागत होते, इतकेच शालेय अभ्यासक्रमात होते. त्यानंतर गांडुळांचा संबंध आला तो अकरावी-बारावीच्या वेळी डिसेक्शनसाठी . त्यावेळीही हा ओला, लिबलिबीत प्राणी हाताळताना आलेली किळसच अधिक लक्षात आहे. पुढे गांडुळांचा ओला कचऱ्याच्या विघटनासाठी वापर या विषयाबाबत कुतुहल वाटल्याने त्याचा थोडासा अभ्यास केला. त्यातूनच गांडुळे ही दिसायला किळसवाणी दिसत असली तरी त्यांचे अदृष्य कार्य बरेच मोठे आहे, हे ज्ञानकण प्राप्त झाले.

गांडूळ हा उत्क्रांतीच्या पायऱ्यांवरचा अगदी अप्रगत असा प्राणी आहे. इतका मागासलेला, की त्याच्यात नर आणि मादी असे लैंगिक विभाजनही झालेले नाही. गांडुळे ही उभयलिंगी असतात. तरीही त्यांचे पुनरुत्पादन हे दोन गांडुळांच्या मीलनानंतरच होते. गांडुळांची अंडी साधारणतः एका मोहरीच्या दाण्याइतकी असतत. त्यांचा आकार लिंबाच्या आकारासारखा असतो. या अंड्यांना ‘ककून्स’ असे म्हणतात. या ककून्समधून दोन ते तीन महिन्यात गांडुळांची पिले बाहेर पडतात. गांडुळांना फुफ्फुसे नसतात. त्यांचे श्वसन हे त्यांच्या त्वचेमार्फत होते. त्यामुळे जगण्यासाठी गांडुळांची त्वचा ही सतत ओलसर असावी लागते. उष्ण, कोरडे हवामान आणि थेट, प्रखर सूर्यप्रकाश गांडुळे सहन करू शकत नाहीत. गांडुळांना डोळेही नसतात, त्यामुळे ती काही पाहू शकत नाहीत.अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ हे गांडुळांचे मुख्य अन्न.जिवंत वनस्पतींची मुळे वगैरे कुरतडण्याइतपत त्यांच्या जबड्यांत जीव नसतो, त्यामुळे सजीव वनस्पतींना ती काही अपाय करू शकत नाहीत. थोडक्यात, आपली जी समस्या आहे, ते गांडुळांचे जीवन आहे. ओलावा, कुजणारा कचरा, थोडीशी माती , आणि थेट सूर्यप्रकाशापासून व भक्ष्यक प्राण्यांपासून (मुंग्या, बेडूक, सरडे इ. ) संरक्षण इतके मिळाले की निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या आदिम प्रेरणेने गांडुळे झपाट्याने वाढतात. अशी परिस्थिती असणाऱ्या जमिनीत (उदाहरणार्थ पानमळ्यात) गांडुळांची प्रचंड वेगाने वाढ होते. गांडूळांच्या अनेक जातींपैकी आयसेनिया फेटिडा अर्थात रेडवर्म ही सर्वपरिचित जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत सर्वत्र सरपटणारी लालसर रंगाची गांडुळे दिसतात, ती हीच. याशिवाय युड्रिलस युजिनी नावाची जांभळ्या रंगाची आणि रेडवर्मसपेक्षा आकाराने थोडी मोठी गांडुळांची जातही गांडुळखत प्रकल्पासाठी वापरली जाते. काही मिलिमिटर लांबीच्या गांडुळांपासून एक मीटर लांबीच्या राक्षसी आकारापर्यंतची गांडुळे निसर्गात पहायला मिळतात.

हे इतके सगळे लिहिण्याचे कारण गांडुळे ही किती निरुपद्रवी आहेत हे ध्यानात यावे हे आहे. अर्थात वळवळणाऱ्या गांडुळांना, विशेषतः जर ती संख्येने खूपच असतील तर, पाहून मनात भीती आणि किळस उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. गांडुळे अंध असल्याने त्यांची ही आंधळी हालचाल अधिकच भयावह वाटते. पण बहुतेक सर्व प्राण्यांप्रमाणे माणूस गांडूळाला जितका घाबरतो, त्याच्या कित्येक पटीने गांडुळे माणसांना घाबरतात. अर्थात गांडुळे माणसाला बघूच शकत नसल्याने हे त्यांचे ‘घाबरणे’ हे सांकेतिक आहे. गांडुळांना माणसांपासूनच धोका अधिक आहे, असे हे म्हणण्याचा हेतू. पण एकदा ही भीती किंवा किळस आपल्या मनातून काढून टाकली ( एका कचरा व्यवस्थापन संस्थेचा सल्लागार म्हणून काम करताना मला हजारो गांडुळे बघावी, प्रसंगी हाताळावी लागली आणि ही भीती माझ्या मनातून गेली) की मग गांडूळ खत प्रकल्प उभा करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे अगदी सोपे आहे. गांडूळ खत प्रकल्प उभा करण्यासाठी सावलीची, आडोशाची गरज असते असे तज्ज्ञ सांगतात, पण वैयक्तिक पातळीवर कचरा व्यवस्थापन करायचे असेल तर याची गरज नाही. मी माझ्या घरातील सर्व ओला कचरा माझ्या गच्चीवर केलेल्या छोट्याशा बागेत मुरवतो. या बागेत काही प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून मी त्यात काही गांडुळे सोडली. मग त्यावर घरातला ओला कचरा त्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकायला सुरुवात केली. काही महिन्यांतच या गांडुळांनी हा ओला कचरा फस्त केला. मग अशा पोत्यांमध्ये मी काही फुलझाडे लावली. आता ही फुलझाडे मस्त बहरून आली आहेत. या पोत्यातल्या झाडांना एक आड एक दिवशी, उन्हाळ्यात रोज, पाणी घातले की झाले. बाकी काही फारसे करावे लागत नाही. निवडुंगाप्रमाणे किंवा कोरफडीप्रमाणे गांडूळ खत प्रकल्प हा ‘थ्रायव्हिंग ऑन निग्लेक्ट’ अशा प्रकारे वाढतो.

गांडुळखताचा प्रकल्प करताना काही पथ्ये पाळावे लागतात. वर लिहिल्याप्रमाणे जमीनीत पुरेसा ओलावा नसेल तर गांडुळे मरून जातात. याउलट जमीन अगदी पाणथळ झाली तरी गांडुळे (बुडून) मरतात. त्यामुळे जमीनीत / मातीत हवा तितकाच ओलावा ठेवणे आवश्यक आहे. अर्थात सरावाने हे ओलाव्याचे प्रमाण किती हे लक्षात येऊ लागते. गांडुळांच्या तोंडात दात नसतात, म्हणून गांडुळांना अन्न म्हणून वापरायचा कचरा शक्य तितका बारीक केलेला असावा. (कचरा जितका बारीक केलेला तितका त्याचा ‘सरफेस एरिया’ अधिक, त्यामुळे तितका त्याच्या विघटनाचा वेग जास्त, हेही वैज्ञानिक सत्य या वेळी ध्यानात यावे. ) गांडुळांची कचरा विघटन करण्याची शक्ती ही काही जादुई नसते. त्यामुळे जमिनीत जेवढी गांडुळे असतील त्या हिशेबानेच जमीनीत कचरा टाकावा. वाजवीपेक्षा अधिक कचरा टाकल्यास तो अनेरॉबिक रीतीने कुजायला सुरवात होते; आणि मग दुर्गंधी, माशा, डास असे प्रश्न निर्माण होतात. ओला कचरा निर्मूलनाच्या गांडूळ खत पद्धतीत दुर्गंधी येत असेल तर काहीतरी चुकते आहे, असे मानावे. काच, प्लॅस्टिक, धातूचे तुकडे हे पदार्थ या प्रकल्पात अर्थातच टाकू नयेत. कीडनाशके, कीटकनाशके, इतर विषारी पदार्थ हे गांडूळांनाही मारक ठरतात.

आता दुसरा प्रश्न असा की ही गांडुळे कुठून आणावीत? जिवंत गांडुळे किंवा गांडुळांपासून तयार केलेले खत (व्हर्मीकापोस्ट) हे बऱ्याच ठिकाणी उपलब्द्ध असते. गांडुळ खत तयार करण्याला उत्तेजन मिळावे म्हणून बऱ्याच शासकीय योजनाही आहेत. गांडुळ खत हे बारीक, काळसर रंगाचे आणि कोणत्याही प्रकारची दुर्गंधी न येणारे असते. योग्य रीतीने तयार केलेल्या

गांडुळ खतात गांडुळांची अंडी असतातच. त्यामुळे अशा प्रकारचे खत वापरले की आपोआपच त्या ठिकाणी गांडुळांची निर्मिती होते. एरवीही शेतातल्या मातीत गांडुळे असतातच, पण आपला हेतू हा कचरा निर्मूलन हा आहे, त्यामुळे त्यासाठी सुरवातीला गांडुळांचे हे ‘विरजण’ घातलेले बरे. हे गांडुळ खत पाचदहा रुपये किलो या दराने मिळते. हे सगळे सुरू करावे ते बाकी पावसाचा भर जरा ओसरू लागला की.

हे सारं कोणासाठी ?

आता एक कळीचा मुद्दा असा की हे सगळे कशासाठी करायचे? मला याची दोन उत्तरे सुचतात. एक थोडे तात्विक स्वरुपाचे आहे. कचऱ्याची निर्मिती, त्याचे विघटन, त्यातून तयार होणारी मूलद्रव्ये, या मूलद्रव्यांपासून होणारी सजीव नवनिर्मिती, त्यापासून परत तयार होणारा कचरा असे हे चक्र शतकानुशतके चाललेले आहे. या चक्राचा तोल बिघडवला तो माणसाने. माणसाने शेती करायला सुरवात केली, माणसाने जंगले तोडली, माणसाने कागद, कापड यांची निर्मिती केली, माणसाने भाजीपाला पिकवला, माणसाने पशुपक्षी माणसाळवले, माणसाने अन्न शिजवायला प्रारंभ केला, माणसाने औद्योगिक क्रांती केली. या तथाकथित प्रगतीतून प्रचंड प्रमाणावर कचरा निर्माण होऊ लागला. मग या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे माणसाचे कर्तव्यच नाही का? ‘बिहेविंग टुवर्डस अदर्स ऍज यू वुड लाईक देम टु बिहेव टुवर्डस यू’ ही ‘गुड मॅनर्स’ ची व्याख्या इथे लागू करायची तर सुसंकृत असण्याचे किमान लक्षण म्हणून आपण करून ठेवलेला पसारा आपणच आवरणे इतके तरी आपण केलेच पाहिजे. दुसरे कारण थोडेसे वैयक्तिक छंदाचे आहे. ओल्या कचऱ्यातून निर्माण केलेल्या छोट्याश्या बागेने मला अपार आनंद दिला आहे. गांडूळ खत हे वनस्पतींना आवश्यक अशा सर्व मूलद्रव्यांनी युक्त असे असते. त्यामुळे गांडूळ खतावर अगदी निरोगी फुलझाडे वाढवता येतात. जरा अधिक कष्ट घेण्याची तयारी असेल आणि जागा आणि पाणी (आणि मुख्य म्हणजे वेळ) यांची कमतरता नसेल तर माफक भाजीपालाही या खतावर वाढवता येतो. एका घरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर एखादे कढीलिंबाचे झाड, चार मिरच्यांची रोपे, दोनपाच टोमॅटोची झाडे, एखादे गवती चहाचे बेट असले बरेच काही वाढवता येते. सकाळच्या पारी या झाडांना पाणी घालणे आणि उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून या लहानशा बागेतून फेरफटका मारणे हा, ज्यांना त्यात रस आहे त्यांच्यासाठी अपार आनंदाचा झरा आहे.

%d bloggers like this: