द टर्मिनेटर

https://commons.wikimedia.org/wiki/File:Artificial_intelligence_(33661764490).jpg
कृत्रिम बुद्धिमत्ता

आइझॅक आसिमोवच्या गोष्टी मी खूप आवडीने वाचल्या आणि वाचते. मुख्यत: रोबोच्या गोष्टी, ज्या विसाव्या शतकात लिहिल्या गेल्या, पण सुमारे तीन शतकांनंतर घडतात. माणसांच्या दृष्टीने धोक्याची किंवा कंटाळवाणी कामे रोबोकरवी करून घ्यायची, ही मूळ कल्पना. तीन नियमांनी बांधलेले रोबो माणसाला कुठल्याही प्रकारे हानी होऊ देणार नाही, हे गृहीत.

या गोष्टी कल्पना म्हणून वाचायला मजा येते. आपल्या आयुष्यात अशी वेळ येणार नाही असे वाटून इतके दिवस सुरक्षितही वाटत होते.

त्याच्या एका गोष्टीत एक लेखक लिहिण्याचे कष्ट कमी व्हावेत म्हणून एक रोबो विकत घेतो. हळूहळू तो रोबो त्या लेखकाची लिहिण्याची पद्घत, शैली, त्याच्या कल्पना इत्यादि पूर्णपणे आत्मसात करतो आणि त्या शैलीत लिहायला लागतो! लिहिणे सुलभ व्हावे म्हणून रोबोचा वापर करायला लेखकाची हरकत नसते, पण त्याच्या सर्जनशीलतेची नक्कल जेव्हा रोबो करू लागतो, तेव्हा ते मात्र त्याला सहन होत नाही. या गोष्टीची आत्ता का आठवण झाली?

…………….

गेओ (Geo) या जर्मन मासिकाच्या एप्रिल १९ च्या अंकात टोबियास हामेलमान यांचा एक लेख वाचला. त्याचा गोषवारा असा-

आपले स्मार्टफोन लवकरच आपली जागा घेतील का? नाही, पण ते तसा प्रयत्न नक्कीच करतील.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे स्मार्टफोन लवकरच काही कामे स्वतंत्रपणे करू लागतील.

एका रेस्टॉरंटमधला फोन वाजतो. तिथला मुख्य वेटर फोन उचलतो. एका प्रेमळ आवाजात एक टेबल राखून ठेवण्याची विनंती केली जाते. किती माणसांसाठी, कधी वगैरे प्रश्नांची उत्तरे दिली जातात. हे करताना विचार करणे, अडखळणे, इत्यादि होते. योग्य प्रकारे संभाषण संपवले जाते.

किती माणसांमध्ये हे संभाषण झाले? मुख्य वेटर नक्की म्हणेल – दोन. पण हे खरे नाही. फोन केला होता स्मार्टफोन असिस्टंटने. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि अतिशय उत्तम भाषा सॉफ्टवेअर यांच्या मदतीने हे काम पार पडले. मे १८ मध्ये गुगल डुप्ले सादर केले गेले. यामुळे भेटीची वेळ ठरवण्याची कामे केली जातील आणि दैनंदिन जीवन सोपे होईल, असा दावा केला जातो.

अशा संवादात डुप्ले अगदी नैसर्गिकपणे काम करते.  हे तुम्हाला विचित्र वाटतंय? एखादे वेळी या संवादातील दोन्ही ‘व्यक्ती’ यंत्रे असू शकतात.

आता असा एक स्मार्टफोन येऊ घातला आहे, जो त्याच्या मालकाशिवाय काम करू शकतो. मालकाच्या आवडीनिवडी, त्याला उपलब्ध असलेला वेळ हे सर्व त्याला माहित असते, आणि त्याच्याशी बोलून त्याला आज्ञा देता येतात. इमेल आणि फोनला तो स्वतंत्रपणे उत्तर देऊ शकतो. दुसऱ्या फोनने संपर्क साधून भेटीची वेळ मागितली की हा फोन हो किंवा नाही म्हणू शकतो – मालकाला कुठलीही कल्पना न देता.

जर फोन खऱ्या व्यक्तीने केला असेल, तर हा फोन मालकाच्या भाषेचा लहेजा, बोलण्याची पद्धत, आवडीनिवडीचा विचार करून बोलतो.

अशा वेळी आपण आपल्या मित्राशी बोलतो आहोत का त्याच्या डिजिटल सहाय्यकाशी, हे आपल्याला कळणारच नाही! माणसाला त्याचं आयुष्य आनंदानं जगता यावं म्हणून ही सोय आहे, असा दावा याचे निर्माते करतात.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जगणं सोपं झालं तर हवंच आहे. पण मित्राबरोबर भेटीची वेळ ठरवताना त्याच्याशी आपणच बोलायलाच मला आवडेल. मित्राशी गप्पा मारताना त्याचा आवाज ऐकायला, त्याच्या आवाजातून त्याला कसे वाटते आहे हे समजून घ्यायला मला आवडेल. तसेच माझा स्मार्टफोन माझ्यासारखा बोलायला लागला तर मला मुळीच आवडणार नाही.

दैनंदिन जीवनात मदत करणाऱ्या मदतनिसांचे निर्माते एक गोष्ट विसरतात, की छोटे छोटे संवाद हे माणसा-माणसांमधील संबंधांसाठी महत्त्वाचे असतात. दुसऱ्या बाजूने विचार केला, तर – आपले स्मार्टफोन जर एकमेकांशी बोलत असतील, तर आपण कदाचित पूर्वीप्रमाणे बसमध्ये आपल्या शेजारी बसणाऱ्या माणसाशी बोलू!

……………

खूप काळापूर्वी जेव्हा मला सर्वप्रथम एका टेलिफोन आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवण्याची वेळ आली होती, तेव्हा मी फोन ठेवून दिला होता. मशीनशी काय बोलायचे, असे वाटून. निदान त्या वेळी एक यंत्र माझ्याशी बोलत आहे हे मला माहित होते. गुगल डुप्लेच्या बाबत तेही कळणे अवघड किंवा अशक्य आहे.

…………..

काही काळापूर्वी उबर बद्दल एक लेख वाचनात आला. त्यामध्ये असे म्हटले होते, की उबरच्या मोटरचालकांचे भवितव्य माणसे ठरवत नसून तर्कमाला – algorithms – ठरवतात. याचा दुसरा अर्थ असा, की त्यांचे मालक माणसे नाहीत, तर अमानवी प्रणाली आहेत, ज्या अर्थातच सहवेदना, माणुसकी वगैरे जाणत नाहीत.

अलेक्साचा मध्यंतरी अचानक खूप बोलबाला झाला होता. नंतर त्यावर टीकाही झाली. दोन गोष्टी वाचल्या, त्याचा इथे उल्लेख करते. एक होता विनोद – अलेक्सा तुमच्यासाठी सर्व गोष्टी करू शकते, तर त्याला/तिला सांगायचे – अलेक्सा माझ्या मुलांना वाढव. Alexa, raise the kids.

दुसरी गोष्ट प्रत्यक्ष घडलेली होती. एका घरात नवराबायकोचे भांडण चालू होते. अलेक्साने त्या भांडणाची माहिती इमेलवरून त्या नवऱ्याच्या सहकाऱ्याला पाठवून दिली! भांडणातल्या कोणत्या तरी शब्दाचा अर्थ चुकीचा लावल्यामुळे हे घडले असावे.

….

बापरे!  आपण माणूस म्हणून किती काळ जगू शकणार आहोत? का कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली यंत्रे आपण कसे जगावे हे ठरवणार आहेत? ही यंत्रे तयार करणारे आपल्यावर सत्ता गाजवू शकतात, कारण त्यांच्याकडे आपली सर्व माहिती जाते, ज्याचा ते गैरवापर करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता नक्की कशी कामे करते, आपल्याला दिसणाऱ्या गोष्टींखेरीज ती आणखी काय करते, हे आपल्याला कधीच सांगितले जात नाही. हे खूपच धोकादायक आहे.

असिमोव्हच्या गोष्टीत निदान रोबो ‘मनाने’ चांगले होते. आजकालच्या युद्धसदृश परिस्थितीत, जिथे दहशतवादाचा सतत धोका आहे, तिथे रोबोचा वापर वाईट कामासाठी होणार नाही, अशी खात्री कोणीच देऊ शकत नाही.

दुसरा मोठा धोका म्हणजे मेंदूचा वापर करण्याचा आळस, ज्यामुळे मेंदूला गंज चढू शकतो. साधी दूरध्वनी क्रमांक लक्षात ठेवण्याची गोष्ट घ्या. पूर्वी अनेक क्रमांक लक्षात ठेवले जात होते, कारण तसे करणे सोयीचे होते. आता एकतर सर्व क्रमांक दहा आकडी असतात. फोनबुकमध्ये अनेकदा नावही वाचावे लागत नाही, हव्या त्या व्यक्तीचा फोटो दिसतो. त्याही पुढे जाऊन जर स्मार्टफोनला तोंडी आदेश देऊन कामे होणार असतील, तर मग बघायलाच नको.

या सर्व धोक्यांमुळे कधीकधी इतके वैराग्य येते, की आपल्या मेंदूची विचार करण्याची, वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी सर्व प्रकारची हुषार यंत्रे वापरणे बंद करावे असे वाटते.

%d bloggers like this: