माहिती साक्षरता – ओळख

सध्या माहिती साक्षरता ही एक नवीन संज्ञा प्रचारात आलेली आहे. त्याची सर्वमान्य व्याख्या अशी नाही.
विकीपीडिआमध्ये दिलेल्या व्याख्येचे स्वैर भाषांतर असेः “माहिती वाचणे, माहितीवर काम करणे, माहितीचे विश्लेषण करणे, माहिती वापरून तर्कशुद्ध बाजू मांडणे….. पण ही साक्षरता फक्त माहिती वाचण्यापुरती मर्यादित नसून माहिती वाचणे, समजावून घेणे आणि तिचे विश्लेषण करणे हेही त्यात येते”.
‘माहिती शास्त्रज्ञ’ असे एक नवीन पदही अनेक कंपन्यांमध्ये निर्माण झालेले दिसते. माहिती हा सर्वमान्य शब्द वापरून आपण या संज्ञेबद्दल थोडे समजावून घेऊ. काही जण माहितीऐवजी ‘विदा’ हा शब्द वापरतात.

संज्ञेचे महत्व

आपण आपल्या सर्वसामान्य जीवनात या संज्ञेचे काय महत्त्व आहे हे समजावून घेऊ. मराठीत आपण माहिती हा शब्द इंग्रजीतल्या ‘डाटा’ आणि ‘इंफर्मेशन’ या दोन्ही अर्थांनी वापरतो. त्यामुळे थोडा समजुतीचा घोटाळा होण्याची शक्यता आहे. पण तसे होण्याची गरज नाही. किंबहुना विषय सुलभरीतीने समजवून घेण्यासाठी एकाअर्थी हे बरेच आहे. ज्ञान हा शब्द आपण ‘नॉलेज’ यासाठी वापरतो. माहिती संकलित करून त्याचे विश्लेषण केले आणि आधीच्या धारणांशी ते पडताळून पाहिले की ज्ञान जन्माला येते असे आपण आपल्यापुरते म्हणू. ज्ञानी मंडळींना ते पटेलच असे नाही. पण आपल्याला समजण्यापुरते ठीक आहे. तसेही आपण ‘माहिती’ या संज्ञेभोवतालीच घोटाळणार आहोत.

गुणात्मक आणि संख्यात्मक

माहिती ही दोन प्रकारात मोडते. गुणात्मक आणि संख्यात्मक.
‘मिलिंद अतिशय हुशार विद्यार्थी आहे’ ही गुणात्मक माहिती. ‘मिलिंदला आठवीत ८३ टक्के गुण मिळाले’ ही संख्यात्मक माहिती.
‘पुण्यात काल खूप पाऊस पडला’ ही गुणात्मक माहिती. ‘पुण्यात काल ४७ मिमी पाऊस पडला’ ही संख्यात्मक माहिती.
‘शर्वरी खूप उंच आहे’ ही गुणात्मक माहिती. ‘शर्वरीची उंची पाच फूट दहा इंच आहे’ ही संख्यात्मक माहिती.

एक सर्वत्र आढळणारी प्रवृत्ती अशी की आपण गुणात्मक माहिती जास्ती वापरतो. संख्या वापरण्याची नावड यामागे असते. ही नावड सुरुवातीला संख्या वापरण्यातल्या अडचणींमुळे निर्माण होते आणि दिसामासाने वाढतच जाते. या अडचणी संख्या वापरण्याची सवय नसल्याने निर्माण होतात.

माहिती साक्षरता वाढवण्यासाठी कुठली माहिती गोळा करावी आणि तिचे कसे विश्लेषण करावे हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यातील संख्यात्मक माहितीचे विश्लेषण कसे करावे याबद्दल आधी पाहू.

दोन संख्यातील फरक सांगण्याच्या दोन पद्धती आहेत. आकड्यांत सांगणे वा टक्केवारीत सांगणे. बहुतेक वेळेला आकड्यांत सांगणे हेच केले जाते. दीपालीचा पगार पाच हजाराने वाढला; पेट्रोल दीड रुपयांनी महाग झाले; केळी डझनामागे तीन रुपयांनी स्वस्त झाली इ.

यातली कुठली पद्धत योग्य? या प्रश्नाचे उत्तर गमतीशीर आहे – कुठलीच एक पद्धत नाही. दोन्ही एकत्र सांगणे हेच योग्य. कसे आणि का ते पाहू.

आधी टक्केवारीतील फरक कसा काढायचा याची उजळणी करू.
समजा साखरेची किंमत ‘क’ रुपये होती ती वाढून ‘ख’ रुपये झाली. तर टक्केवारीतील फरक काढण्यासाठी सूत्र खालीलप्रमाणेः
[(ख – क) / क] * १००.
यात गोल कंसातील क्रिया (वजाबाकी) आधी करायची.
मग चौकोनी कंसातील क्रिया (भागाकार) करायची.
मग * याने दर्शवलेला गुणाकार करायचा.

समजा साखरेची किंमत किलोमागे ३५ रुपये होती ती ४२ रुपये झाली.
[(४२ – ३५) / ३५] * १००
४२ – ३५ = ७
[७ / ३५] * १००
७ / ३५ = १/५
[१/५]*१००
१००/५ = २०
= २०%
म्हणजे साखरेतील भाववाढ रुपयांत ७ रुपये आणि टक्क्यांत २० टक्के झाली.

आता दोन्ही एकत्र सांगण्याची गरज काय? ७ रुपये म्हटले तरी पुरेल. त्यासाठी एक उदाहरण बघू.
वरील सूत्र वापरून खालील आकड्यांतील टक्केवारीतील फरक काढा.
२५ ते ५०.
५० ते ७५.
७५ ते १००.
१०० ते १२५.
१२५ ते १५०.

आकड्यांतील फरक दर वेळेस २५च आहे.
पण टक्केवारीतील फरक
२५ ते ५० – फरक १००%
५० ते ७५ – फरक ५०%
७५ ते १०० – फरक ३३.३३%
१०० ते १२५ – फरक २५%
१२५ ते १५० – फरक २०%

म्हणजे फक्त आकड्यांत फरक सांगितला तर सगळे बदल सारखेच वाटतील. पण टक्क्यांत सांगितले तर त्यात १०० टक्क्यांपासून २० टक्क्यांपर्यंत हेलकावे बसतील.

 • दीपालीचा पगार पाच हजाराने वाढला.
  दीपाली ही जर वाढीअगोदर महिन्याला लाख रुपये पगार असलेली व्यक्ती असेल तर तिच्या पगारातली वाढ ५% झाली. पण तिचा पगार जर वीस हजार रुपये असेल तर ती वाढ २५% झाली.
 • पेट्रोल दीड रुपयांनी महाग झाले.
  वाढीअगोदर पेट्रोलचा दर जर ६० रुपये लिटर असेल तर ही वाढ २.५% झाली. जर ७५ रुपये लिटर असेल तर २% झाली. जर १०० रुपये लिटर असेल तर १.५% झाली.
 • केळी डझनामागे तीन रुपयांनी स्वस्त झाली.
  वाढीअगोदर जर केळी २४ रुपये डझन असतील तर ती १२.५ टक्क्यांनी स्वस्त झाली. जर ३६ रुपये डझन असतील तर ८.३३ टक्क्यांनी स्वस्त झाली.

पावसाच्या सरासरीचे उदाहरण

आता खाली पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पावसाची सरासरी आणि या वर्षी झालेला पाऊस यांची आकडेवारी पाहू.

तालुका सरासरी पाऊस (मि.मि.) या वर्षीचा पाऊस (मि.मि.)
हवेली 579.1 454.42
मुळशी 1585.7 2332.83
भोर 960 1599.13
मावळ 1219.6 2688.49
वेल्हे 2519.2 2333.5
जुन्नर 678.3 969.11
खेड 610.4 924.9
आंबेगाव 720.8 633.98
शिरूर 437.6 265.44
बारामती 421 248.5
इंदापूर 421.4 138.25
दौंड 383.9 161.13
पुरंदर 457.9 402.71

(माहितीस्त्रोत – लोकसत्ता ९ ऑगस्ट २०१९)

यातून आपल्याला काय काय समजेल?

 1.  सगळ्यांत कमी सरासरी पावसाचा तालुका कुठला?
 2.  सगळ्यांत जास्त सरासरी पावसाचा तालुका कुठला?
 3.  (1) आणि (2) मधील तालुक्यांच्या सरासरी पावसाच्या आकड्यांची तुलना – ‘मिमी’त आणि ‘टक्केवारी’त – करा.
 4.  या वर्षी सगळ्यांत कमी पाऊस कुठल्या तालुक्यात झाला?
 5. या वर्षी सगळ्यांत जास्ती पाऊस कुठल्या तालुक्यात झाला?
 6. वरील (4) आणि (5) मधील तालुक्यांच्या पावसाच्या आकड्यांची तुलना – ‘मिमी’त आणि ‘टक्केवारी’त – करा.

या सहा प्रश्नांची उत्तरे देऊन झाली की तुम्ही ती उत्तरे ‘प्रतिक्रिया’ म्हणून नोंदवा. तसेच, या आकड्यांवर अजून प्रश्न तयार करा नि तेही ‘प्रतिक्रिया’ म्हणून पाठवा. म्हणजे मग आपण दुसऱ्या भागाकडे जाऊ.

तुमचे मत नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: