विज्ञान केंद्र उपक्रमः ऑगस्ट-सप्टेंबर २०१९

नमस्कार.

गेल्या महिन्यात एका नव्या प्रकल्पाची योजना आखण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागला. त्यामुळे पूर्वी चालू असलेले उपक्रम वगळता नवे कोणतेही उपक्रम चालू केले नाहीत. मात्र, काही जुन्याच प्रकल्पांना नवा प्रतिसाद मिळाला.

  • विज्ञानदूतचे अवकरित (downloaded) अंक छापून आपल्या गावी, आपल्या शाळेत पाठवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विज्ञानदूतच्या अंकांचे एकूणातच जास्त संख्येने अवकरण (downloads) होत आहे. स्थानिक शाळांमधे वाटण्याच्या छापील अंकांची संख्या आता १०० झाली आहे. या शाळांत विज्ञानदूतचे वाचन वर्गात केले जाते किंवा दर्शनीय फलकांवर हा अंक लावला जातो. अशा अंकांचे वितरण करणे जिकीरीचे आणि खर्चिक असते. पण लोकांच्या अशा प्रतिसादामुळे ही अडचण सुटेल असे दिसते. त्यामुळे हा अंक माहिती, ज्ञान आणि मनोरंजन यांनी अधिक समृद्ध व्हावा इतकेच आमचे काम राहील. तुमच्या पैकी अनेक आपापल्या विषयातील तज्ञ आहात. विज्ञानदूत मधे साजेल अशा तऱ्हेचे लेखन करून तुम्ही या कामात हातभार लावू शकता. या महिन्याच्या (सप्टेंबर २०१९) विज्ञानदूतचे अवकरण (download) येथे करता येईल.
  • गेल्या महिन्यात मुक्त संगणकीय प्रणालीं बद्दल एक स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. त्या स्पर्धेला अक्षरशः शून्य प्रतिसाद मिळाला. आमच्या आयोजनातल्या त्रुटी हे एक कारण वगळता या विषयाच्या महत्वाबद्दलचे अज्ञान, हे एक प्रमुख कारण आहे असे आम्हाला वाटते.  ज्या शाळा या विषयावर विद्यार्थी व शिक्षकांचे प्रबोधन करण्याचे निमंत्रण देतील त्या शाळांत विज्ञान केद्राचे सदस्य जातील आणि हे महत्व विषद करतील. भ्रमणध्वनी पासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणांपर्यंत सर्व ठिकाणी संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) आहेत. या  प्रणाली तपासून घेण्याचे स्वातंत्र्य सर्व नागरिकांना असायलाच हवे. म्हणून मुक्त संगणकीय प्रणालींचे महत्व विज्ञान केंद्राला वाटते. “मुक्त संगणकीय प्रणाली” या विज्ञान केंद्राच्या पुस्तिकेचे अवकरण येथे करता येईल.
  • श्री. दिलीप कुलकर्णी यांनी त्यांचा “गतिमान संतुलन” हा अंक केंद्राच्या संकेतस्थळावर कोणीही अवकरण करण्यासाठी ठेवायला परवानगी दिली आहे. पोस्टाच्या वितरणातील अडचणींमुळे ज्यांना छापील अंक मिळत नाहीत त्यांच्यासाठीसुद्धा ही संधी ठरते. या महिन्याचा अंक (ऑगस्ट २०१९) येथे अवकरित (download) करता येईल.
  • विज्ञान केंद्राने आरोग्य या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुरुवातीला काही महत्वाची माहिती आपल्या वाचकांपर्यंत पोचवीत आहोत. आरोग्यविषयक माहितीचा दुरुपयोग करून धंदेवाईक वृत्तीचे लोक/संस्था (तुमचे अज्ञान हाच आमचा फायदा हे तत्व वापरून) रुग्णांची फसवणूक करू शकतात. गेल्या महिन्यात रोग्यांसाठी अवघड कोडे हा लेख याच विषयावर प्रसिद्ध केला.
  • स्थानिकीकरणाचे तत्व विज्ञान केंद्र मोठ्या प्रमाणावर राबवू इच्छिते. त्यानुसार घर तेथे भाजीबाग हा कायम चालणारा प्रकल्प सुमारे २ वर्षांपूर्वी हाती घेण्यात आला.
    • “हिरवी माया” हा कचऱ्याचे रूपांतर संपत्तीत करणारा संच त्यावेळी विकसित केला होता.
    • केंद्राचे सदस्य आणि हितचिंतक घर तेथे भाजीबाग या प्रकल्पाअंतर्गत सतत प्रयोगशील आहेत. घराच्या अंगणात, छतावर, गच्चीत किंवा गॅलरीत भाजी पिकवता यावी म्हणून केलेला नवा यशस्वी प्रयोग या ठिकाणी पहाता येईल. ज्यांना स्वतः करून पहायला वेळ नसेल त्यांना तो विकत मिळण्यासाठी संपर्काची सोयही तेथे केली आहे.

नवे लांब पल्ल्याचे काही प्रकल्प विज्ञान केंद्र ठरवीत आहे. हे प्रकल्प सुरू झाले की तुमच्या पर्यंत त्यांची माहिती पोचवली जाईलच. धन्यवाद.

%d bloggers like this: