विज्ञान केंद्र उपक्रमः सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९

नमस्कार.

गेल्या महिन्यात जुने काही उपक्रम यशस्वीरित्या चालू राहिले. त्यात इलेक्ट्रॉनिक्स क्लब, घर तेथे भाजीबाग, विज्ञानदूत हे उपक्रम महत्वाचे आहेत. त्याशिवाय दोन उपक्रम नव्याने चालू झाले. त्या सर्वांची माहिती पुढील प्रमाणे….

  • गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने इलेक्ट्रॉनिक्स क्लबमध्ये इलेक्ट्रॉनिक्स संबंधी विविध विषय (जसे Analog electronics, digital electronics fundamentals) चर्चिण्यात आले. त्यातून या विषयांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली.
  • विज्ञानदूत या मासिकाचे प्रकाशन व वितरण नेहमीप्रमाणे १५ ऑक्टोबरला करण्यात आले. हा अंक अवकरण (download) करून, छापून, शाळा महाविद्यालयांत वितरित करण्याचे प्रमाण वाढते आहे ही आनंदाची गोष्ट आहे. या अंकाचे अवकरण याठिकाणी तुम्हीसुद्धा करू शकता. तुमच्या शाळेत, महाविद्यालयात, शेजारी, मित्र व नातेवाइकांमधे तो (छापून वा इ-रूपात) जरूर वितरित करा.
  • विज्ञान केंद्राचे सर्व प्रकल्प मुक्त असतात. हे प्रकल्प विकसित करण्यामागे त्याचे व्यापारी तत्वावर उत्पादन व्हावे व लोकांच्या थेट उपयोगी पडावे ही भूमिका आहे. गेल्या महिन्यात एका नवउद्योजकाने या प्रकल्पांतील सनटाइम हा प्रकल्प वापरून व्यापारी तत्वावर उत्पादन चालू केले आहे. या उद्योजकाला विज्ञान केंद्र विविध प्रकारची मदत देत आहे. त्यासाठी विज्ञान केंद्र कोणतेही शुल्क आकारत नाही. विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या “स्वतःची वेबसाइट बनवा” या कार्यशाळेत भाग घेऊन या उत्पादनाचे संकेतस्थळही निर्माण केले जाईल. या उत्पादनाची अधिक माहिती उत्पादन रुळल्यावर वाचकांना जरूर उपल्ब्ध करून दिली जाईल.
  • गेल्या महिन्यात व्यावसायिक व विद्यार्थी यांच्यासाठी आणखी एक साप्ताहिक उपक्रम सुरू करण्यात आला. मुक्त संगणक प्रणाली वापरून ज्या व्यक्ती निर्मिती करतात, त्यांचा चर्चागट स्थापन झाला. या गटात विद्यार्थी व व्यावसायिक या दोहोंचाही समावेश आहे. हा चर्चागट दर शनिवारी सायंकाळी ५ः३० ते ७ः०० या वेळात विज्ञान केंद्राच्या कार्यालयात भेटून स्वतः केलेल्या कामांची माहिती व अनुभव यांची देवाणघेवाण करतो.
  • या महिन्यात ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते श्री. दिलीप कुलकर्णी यांचा गतिमान संतुलनचा जोड अंक नेहमी प्रमाणे वाचकांसाठी या ठिकाणी उपलब्ध केला आहे. या अंकात मोबाईल तंत्रज्ञान वापरण्याचे धोके हा विषय हाताळला आहे. वाचकांना त्यातून नक्कीच बोध घेता येईल.

धन्यवाद.

%d bloggers like this: