पृथ्वी, जंगल, झाड आणि मानव

पृथ्वीवरील एकूण जंगलांपैकी आत्तापर्यंत मानवाने निम्मी नष्ट केली आहेत, असा अंदाज आहे. तरीही अजून माणशी 400 झाडे शिल्लक आहेत. झाडतोडीमुळे आणि जंगलांना आगी लावल्यामुळे हवामानबदलाचा वेग वाढतो. तापमानाच्या नोंदी करायला सुरुवात झाल्यापासूनचा काळ विचारात घेतला, तर गेली चार वर्षे सर्वात उष्ण होती. आर्कटिक मधील हिवाळ्यातले तापमान 1990 च्या तुलनेत 3 डिग्री सेल्सियसने वाढले आहे.

समुद्राप्रमाणेच जंगलेही तापमानवाढीला अटकाव करण्याची नैसर्गिक सोय आहे. झाडे नसतील, तर तापमानवाढीच्या विरोधातली लढाई लढता येणार नाही. झाडात कर्ब साठवला जातो. त्याउलट गाड्या, कारखाने आणि गुरांमुळे तो वातावरणात सोडला जातो. झाडे वातावरण थंडही करतात.

अमॅझोनच्या जंगलात जगातला 14 टक्के कर्बवायू शोषण्याची क्षमता आहे. ब्राझील सरकारच्या आशीर्वादाने तिथे सध्या ज्या वेगाने वृक्षतोड व जाळपोळ होते आहे, त्यामुळे युरोपमधील देशांच्या सरकारांची घबराट झाली आहे. त्यांनी ब्राझीलला अमॅझोन वाचवण्यासाठी मदत देऊ केली, पण ब्राझीलने ती नाकारली, हा वसाहतवादाचा नवा प्रकार आहे, असे कारण देऊन. यात राजकारणाचा भाग आहेच, पण नीट विचार केला, तर ब्राझीलचे म्हणणे योग्य आहे. आजही ब्राझीलचा 60 टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. त्या तुलनेत जर्मनीचा 32 टक्के भाग, तोही एकसुरी जंगलाखाली (mono culture) आहे.

सुमारे दोनशे वर्षांपूर्वी जर्मनीमधली जंगले नेस्तनाबूत करून ती जमीन इतर कारणांसाठी वापरायला सुरुवात झाली. नंतर काही प्रमाणात वृक्षलागवड झाली, पण ती जंगले एकाच प्रकारच्या, सरळसोट वाढणाऱ्या, कापायला सोप्या अशा सूचीपर्णी वृक्षांची. त्यामुळे होणारे तोटे वेगळेच.

अमॅझोनचे जंगल कसे वाचवायचे ? ब्राझीलचे म्हणणे असे, की आम्हाला मदत नको. त्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडेच झाडे लावा, जंगले वाढवा. दरम्यानच्या काळात ब्राझीलचे लष्कर आगी विझवण्यासाठी पाठवण्यात आले आहे. त्यांना हे काम कितपत जमणार, माहीत नाही. नवीन आगी लावण्यावर दोन महिने बंदी घालण्यात आली आहे.

जर्मनीत गेली काही वर्षे उष्णतेच्या तडाख्यामुळे पूर्वी लावलेली झाडे मरू लागली आहेत. यावर उपाय म्हणून नवीन लागवड करताना उष्ण प्रदेशातली, जास्त तापमान सहन करू शकतील अशी झाडे लावायचा विचार चालू आहे. याचा फायदा लगेच मिळणार नाही, पण काही दशकांनी नक्की मिळेल.

मुळात अशा प्रकारे पुढचा विचार केला तरच धडगत आहे. नाहीतर झाडे कापणे किती कमी वेळात होते, याचा अनुभव आपल्या राज्यात आपण घेतच आहोत.

जंगल म्हणजे केवळ झाडे नाहीत. जमिनीत पाणी किती मुरेल व टिकेल, हेही त्यामुळे ठरते. जंगलांचा हवामानावर परिणाम होतो, तसेच ती नैसर्गिक वातानुकूलन यंत्र म्हणून काम करतात.

जंगल जितके मोठे, मिश्र व नैसर्गिक असेल, तितका त्याचा चांगला परिणाम पाण्याचे साठे, तापमान आणि हवामानावर होतो. जंगल जितके नैसर्गिक असेल, तितका जास्त कर्बवायू ती शोषतात. त्यासाठी आहेत ती जंगले टिकवणे आवश्यक आहे. म्हणून मुद्दाम आगी लावून जंगल नष्ट करणे बंद केले पाहिजे. शेतीसाठी, चराऊ कुरणांसाठी जमीन मिळवण्यासाठी हे केले जाते.

तत्वत: नव्याने झाडे लावणे आणि जंगल तयार करणे शक्य आहे. पण ते खूप महाग आणि कष्टाचे आहे. जगभर आवश्यक तेवढी जंगले नव्याने तयार करणे कदाचित अवघड जाईल, पण काही प्रयोग यशस्वी झाले आहेत.

एका ऑस्ट्रेलियन माणसाने शोधलेल्या पद्धतीने इथियोपियात नव्याने वनीकरणाचा प्रयोग चालू आहे. त्यामुळे आटलेल्या विहिरी व तलावांना पुन्हा पाणी लागते आहे. पाऊस वाढला आहे. हवा थंड झाली आहे, वादळे कमी त्रासदायक झाली आहेत. धुळीची वादळे आणि पुराचा त्रास कमी झाला आहे.

झाडे कापल्यावरही जमिनीत मुळे शिल्लक राहतात. त्यांना पुन्हा वाढण्याची संधी देणे, असे या स्वस्त व मस्त पद्धतीचे वर्णन करता येईल.

तात्कालिक फायद्यांचा विचार करायचा, का पुढील दशकांचा, शतकांचा, पिढ्यांचा विचार करायचा, याचा निर्णय समग्र मानवजातीने घेण्याची वेळ आता आली आहे.

झाडे मोठी होऊ द्या, म्हातारी होऊ द्या, तरच माणूस मोठा होईल, तगेल, सुखाने जगेल.

आभार: Der Spiegel, Sueddeutsche Zeitung

%d bloggers like this: