करोनाः काही प्रश्नोत्तरे

करोना विषाणु संबंधी काही प्रश्नोत्तरे पुढे दिली आहेत. योग्य कृती करण्यास ती बोधप्रद ठरतील अशी आशा आहे.

करोना विषाणु विविध पृष्ठभागांवर किती टिकून रहातो ?

संशोधनावरून असे लक्षात आले आहे की करोना विषाणु विविध पृष्ठभागांवर अनेक दिवस तग धरू शकतो. उदा. दाराच्या मुठी, जिन्याचे व गॅलरीचे कठडे किंवा काचसामान.
करोना विषाणु हा शिंका आणि खोकला यातून पसरू शकतो हे आता माहिती झाले असले तरी तो हवेतून पसरतो का पृष्ठभागावरून या बद्दल खात्री नव्हती. आता असे स्पष्ट झाले आहे की तो दोन्ही ठिकाणाहून पसरतो.

हा विषाणु हवेतून पसरतो का ?

COVID-19 हा विषाणु कठीण पृष्ठभागांवर तग धरु शकतो का या विषयी अमेरिकी संशोधन संस्था (US Centers for Disease Control and Prevention) असे म्हणते की विषाणु असलेल्या कठीण पृष्ठभागाला स्पर्श करून मग तोंड, नाक किंवा डोळे यांना स्पर्श केल्यास हा विषाणु पसरू शकतो.
याचा अर्थ असा की विषाणु बाधित व्यक्तीकडून शिंका वा खोकल्याचे शिंतोडे दरवाजांच्या मुठी, लिफ्टची बटणे, कठडे अशा ठिकाणांवर उडतात आणि या ठिकाणी स्पर्श करणाऱ्या व हात न धुता स्वतःच्या चेहऱ्याला हात लावणाऱ्या इतरांकडे जातात.
खोकला किंवा शिंक यांची नक्कल करणाऱ्या नेब्युलायझर यंत्राने हवेत विषाणु फवारून National Institutes of Health या अमेरिकी संस्थेने हे विषाणु विविध पृष्ठभागावर कसे जातात याचा अभ्यास केला.

पृष्ठभागावर विषाणु किती काळ तगतात ?

या बद्दलचे संशोधन असे सांगते की covid-19 हा विषाणु बाधित व्यक्ती कडून फवारला गेल्यावर हवेत साधारण तीन तासांपर्यंत टिकतो. नंतर तांब्यावर ४ तास, पुठ्ठ्यावर २४ तास तर प्लास्टिक व स्टेनलेस स्टीलवर तीन दिवसांपर्यंत टिकतो. ही निरीक्षणे अजून इतर शास्त्रज्ञांनी मान्य केलेली नाहीत परंतु वैज्ञानिक दृष्ट्या योग्य वाटतात.

करोना विषाणु कपड्यावर किती तग धरतो ?

कपडे किंवा सतरंजा यावर हा विषाणु किती तग धरतो या बद्दल फारसे संशोधन झालेले नाही. पण Daniel Kuritzkes हे संसर्गजन्य रोगांचे तज्ञ असे म्हणतात की सपाट आणि कठीण पृष्ठभागांवर हा विषाणु जास्त टिकाव धरेल. कपडे किंवा सतरंजांवर नाही.

काचसामानावर करोना विषाणु किती टिकाव धरेल ?

Daniel Kuritzkes यांनी असेही सांगितले की मानवी अन्नावर हे विषाणु जास्त धोकादायक नाहीत कारण ते श्वसनसंस्थेवर हल्ला करतात, पचनसंस्थेवर नव्हे. तुमच्या हातांवरून ते नाक, डोळे, तोंड या ठिकाणी पसरतात. भांडी, कप-बशा या मोठ्या प्रमाणात हॉटेलांमध्ये अनेकांसाठी वापरल्या जातात. त्या जर व्यवस्थित धुतल्या गेल्या नाहीत तर हे विषाणु तीन दिवसांपर्यंत या ठिकाणी तग धरू शकतात.

बॅगांच्या हँडल्सवर करोना किती दिवस टिकू शकतात ?

हँडबॅग्ज या असे विषाणु पसरवणाऱ्या वस्तूंपैकी फार महत्वाच्या ठरतात. अशा बॅगा एकूण १० हजार प्रकारचे जीवाणु बाळगू शकतात. या दृष्टीने त्यांना संडासापेक्षाही अधिक घाणेरडी वस्तू असे म्हटले पाहिजे.
मात्र COVID-19 विषाणु अशा बॅगांवर, कपड्यांवर किंवा सतरंज्यांवर अजूनपर्यंत आढळलेला नाही. मात्र असा हँडबॅगा फरशीवर ठेवणे धोकादायक आहेच.

स्नानगृहातून वा संडासांतून हा विषाणु फैलावू शकेल काय ?

याचे साधे उत्तर होय असे आहे. व्यक्तीच्या शौचाद्वारे हे विषाणु पसरू शकतात विशेषतः हात व्यवस्थित रित्या धुतले नसतील तर. संडासातील “फ्लश” हा सुद्धा अशा विषाणूंचा फवारा (शिंक व खोकल्याप्रमाणे) आजूबाजूला मारू शकतो. तेव्हा अशा फ्लश पासूनही सावध राहिले पाहिजे.
संडास वापरतानाही सावध राहिले पाहिजे. कमोडवरील झाकण ठेवा, एक पाऊल मागे या, चेहरा झाका आणि हात साबणाने धुवा. ही पद्धत सर्वात सुरक्षित आहे.
संडास धुतानाही काळजी घ्यावी लागेल. जंतुनाशकाने संडास पुसून घ्यावा. त्यातही ब्लीचिंग पद्धतीचे जंतुनाशक वापरले तर ते अधिक सुरक्षित ठरेल.

पृष्ठभाग जंतुनाशकाने पुसल्याने विषाणुंचा नाश होईल का ?

२०१८ साली केलेल्या अभ्यासानुसार रोगकारक जंतूंचा संसर्ग लोकांच्या पोटातील व विष्ठेतील जंतूंमुळे होतो. असे जीवाणु-विषाणु सार्वजनिक ठिकाणी टच स्क्रीन्स असतात त्यावर तग धरून राहतात. आपण ज्या कशाला स्पर्श करतो, ते सारे प्रथम धुवून पुसून घेणे आवश्यक आहे.
डॉ.चार्ल्स गेर्बा या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या मते करोना विषाणु हा मेद पदार्थांचा संचय असलेला विषाणु आहे. याचा अर्थ तो जंतुनाशकांनी पुसल्यामुळे सहज नाश पावू शकतो.
एक अहवाल असे दर्शवतो की जंतुनाशके फवारलेली फडकी-कागद, जे विविध पृष्ठभाग पुसायला वापरले जातात, तेच पुन्हा पुन्हा वापरले तर जीवाणु पहिल्या पृ्ष्ठभागावरून दुसऱ्या पृष्ठभागावर नेले जातात. त्यामुळे अशी फडकी-कागद एकदाच वापरून फेकून द्यावीत.
नेहमीच (बेंझालकोनियम क्लोराइड किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड ऐवजी) एथेनॉल किंवा ब्लीच पद्धतीचे स्वच्छता कागद सुचवतात .

तुमचे हात तुम्ही नेहमी का धुवायला हवेत ?

दर तासाला आपण हाताने आपल्या चेहऱ्याला साधारण २३ वेळा स्पर्श करतो. आता आपल्याला माहिती आहे की करोना विषाणु विविध पृष्ठभागांवरून चेहऱ्यावर जातात ते अशा स्पर्शांमधून. हात नेहमी का धुवायचे, हे यावरून स्पष्ट होईल.
साबणाच्या कोमट पाण्याने किमान २० सेकंद हात धुवा. अंगठे, नखे आणि बोटांमधील जागा धुणे विसरू नका.
बर्मिंगहॅम विद्यापीठातील प्रा. विलेम फान शेक यांनी म्हटले आहे की फ्लू च्या विषाणुंपेक्षा करोना विषाणु जास्त वेळ विविध पृष्ठभागांवर टिकून रहातात. त्यामुळे त्यांचा प्रसार वेगाने होतो.
या साऱ्याचा अर्थ स्पष्ट आहे. सर्वांनी वारंवार स्वतःचे हात साबणाने धुवायला हवेत. (कामावरून घरी येताना किंवा घरून कामाला जाताना वगैरे) आणि स्वतःच्या चेहऱ्याला हाताचा स्पर्श शक्यतो टाळायला हवा, मात्र हे फारच कठीण आहे.
दरवाजांच्या मुठी आणि सार्वजनिक जागी असणारे टचस्क्रीन वापरण्याचे टाळणे फारच अवघड आहे.
या संशोधनात असे निष्पन्न झाले आहे की व्यक्तिगत स्वच्छता पाळणे आणि दिवसातून वारंवार हात स्वच्छ धुणे, अल्कोहोल आणि हात धुण्याची रसायने वापरणे, डोळे नाक व तोंड यांना फार वेळा स्पर्श करणे टाळले तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो.

वरील लेख  या लेखाचा अनुवाद आहे.

%d bloggers like this: