करोनाः काही गैरसमजुती व घेण्याची काळजी

कोरोना विषाणु संदर्भात अनेक गैरसमजुती आहेत. त्यातल्या महत्वाच्या काहींचा पुढे उहापोह केला आहे. कोणती काळजी घेतल्याने संसर्गाचा धोका कमी होतो, याचे विवेचनही या लेखात केले आहे.

गैरसमजूत क्र. १ – तोंडावर मास्क लावणे गरजेचे आहे.

तोंडावर मास्क लावून फिरणारे लोक हे आता नित्याचे दृश्य झाले आहे. बसमध्ये, रस्त्यावर, अगदी घरातही, मास्क घालून बसलेली मंडळी सहज दिसतात. इथे दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे हा विषाणू डोळ्यांवाटेही हल्ला करू शकतो, त्यामुळे तोंडावरच्या मास्कच्या वाट्यालाही तो जात नाही. दुसरे म्हणजे, तो विषाणू एअरोसोल्स नावाच्या सूक्ष्म कणांमधून स्वतःला संक्रमित करतो. हे एअरोसोल्स मास्कमधून सहज आरपार जातात.
रोग्यांसाठी आणि रोग्यांची काळजी घेणाऱ्या लोकांसाठी हे मास्क उपयोगी ठरतात.
त्यामुळे, गरज नसताना मास्क खरेदी करून तुम्ही ज्यांना मास्कची गरज आहे अशा लोकांना तुटवडा पडू देऊ नका.

गैरसमजूत क्र. २ – कोरोना विषाणूने आजारी होणे म्हणजे मरण नक्की

हे साफ खोटे आहे. बातम्यांतून ठिकठिकाणी या विषाणूमुळे मरणाऱ्या लोकांचा वाढता आकडा पाहून धसकायला होते. पण जिथून हा विषाणू पसरायला सुरुवात झाली त्या चीनमधील वुहान प्रांतात हा आकडा घसरणीला लागला आहे. चीनमधल्या ‘चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ ने दिलेल्या माहितीप्रमाणे कोरोनाने बाधित झालेल्या लोकांपैकी ८१% लोक ‘सौम्य’ बाधित आहेत. आणि या रोगाने आतापर्यंत २.३% रुग्ण दगावले आहेत.
अर्थात, येथे एक लक्षात घ्यायला हवे, की हे आकडे ‘तपासणी करून’ रुग्ण ठरलेल्या लोकांचे आहेत. वेगळ्या भाषेत, हे रुग्ण तब्येत फारच बिघडली म्हणून रुग्णालयात आले. ज्यांना फारसा त्रास जाणवला नाही असे लोक रुग्णालयात पोहोचलेच नाहीत. असे लोक घरच्याघरी राहून बरे झाले. थोडक्यात, ‘खरा’ मृत्यूदर २.३% पेक्षाही कमी असण्याची दाट शक्यता आहे.
यातून घ्यायचा बोध असा, की गरज नसताना दुकानातून वस्तू खरेदी करून साठवण करण्यापेक्षा गरज पडेल तेव्हा साबणाने स्वच्छ हात धुणे आणि तत्सम आरोग्यदायी सवयी बाणवणे केव्हाही इष्ट.

गैरसमजूत क्र. ३ – बाधित रुग्णाजवळ दहा मिनिटे थांबले तरच कोरोनाचा संसर्ग होतो.

खोकणाऱ्या वा शिंकणाऱ्या रुग्णापासून सहा फुटांच्या आत दहा मिनिटांसाठी राहिले तर संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते हे खरे आहे. पण दहा मिनिटे हा जादूई आकडा नाही. याहून कमी वेळ संपर्क आला तरीही संसर्ग होऊ शकतो. तसेच हा विषाणू इतर हवेखेरीज इतर माध्यमांतूनही पसरू शकतो, ज्याबद्दलची माहिती वेगळ्या लेखात दिली आहेच.

गैरसमजूत क्र. ४ – पाळीव प्राण्यांमधूनही रोगाचा संसर्ग होऊ शकतो.

आपल्या चतुष्पाद मित्रांकडे संशयाने पाहू नका. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे की कुत्री-मांजरे या प्राण्यांतून विषाणू संसर्ग होत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून भीती बाळगण्याचे कारण नाही.

गैरसमजूत क्र. ५ – फ्ल्यू तापाच्या तुलनेत कोरोना म्हणजे काहीच नाही.

खरे तर उलट म्हणता येईल. जरी प्राथमिक लक्षणांमध्ये कोरोना आणि फ्ल्यू तापामध्ये काही साम्ये – खूप ताप, खवखवणारा घसा आणि सततचा खोकला – असली तरी याचा अर्थ त्यावरचे उपचारही सारखेच आहेत असे नव्हे. याचे कारण म्हणजे तांत्रिक भाषेत कोरोना विषाणूचे ‘प्रोफाईल’ हे फ्ल्यूच्या विषाणूपेक्षा खूप जास्त धोकादायक आहे. कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर हा प्रासंगिक फ्ल्यूच्या रुग्णांच्या मृत्यूदरापेक्षा खूप जास्त आहे.

मग निरोगी राहण्यासाठी आणि कोरोना टाळण्यासाठी मी काय करावे?

हा प्रश्न सगळ्यांनी विचारण्याची गरज आहे. दुकाने बंद होतील या भीतीने मालाचा साठेबाजार करणे टाळावे हे इष्ट. स्वच्छतेविषयी सावधगिरी बाळगणे आणि स्वतःची शारिरीक आणि मानसिक पातळीवर काळजी घेणे हे पुरेसे आहे.

तुमच्या व्यायामाच्या सवयी तपासून पहा.

व्यायामशाळा आणि उघड्यावर व्यायाम करायच्या जागा इथून या विषाणूचा संसर्ग फैलावला जातो. विषाणू कुठल्या पृष्ठभागावर किती काळ तग धरून राहतो हे दुसऱ्या लेखात आलेले आहेच. त्यामुळे व्यायामशाळेतील व्यायामाची साधने वापरू नयेत. सध्या आपल्याकडे व्यायामशाळाही बंद ठेवल्यामुळे हा धोका नाही.
तरीही एकत्र व्यायाम / योगासने करणाऱ्या मंडळींनी एक सावधानता बाळगावी – जर बरे वाटत नसेल तर पूर्ण बरे वाटेपर्यंत दांडी मारावी. बरे न वाटणे हे प्रासंगिक सर्दीखोकल्याचेही लक्षण असू शकेल. विशेषतः ऋतूबदलात हा त्रास बऱ्याच जणांना होतो. पण शंकेला जागा ठेवण्यापेक्षा काळजी घेतलेली चांगली.

हात स्वच्छ धुवा

दिवसभरात आपले हात अनेक वस्तूंना जाणता-अजाणता स्पर्श करीत असतात. त्यामुळे साबण आणि पाण्याने हात नीट धुणे गरजेचे आहे. साबणाचा भरपूर फेस करून किमान वीस सेकंद हातावर ठेवा. हाताच्या पंज्याची मागली बाजू, बोटांमधल्या फटी आणि नखांखाली विशेष लक्ष देऊन धुणे गरजेचे आहे. बाहेरून घरी आल्यावर, कचरा टोपलीत टाकल्यावर, जेवणाआधी, प्रातर्विधी उरकल्यावर, कुठल्याही अनोळखी वस्तूला स्पर्श केल्यावर … प्रत्येक वेळेस साबणपाण्याने किमान वीस सेकंद हात चोळून धुवावेत.
जर साबणपाणी उपलब्ध नसेल तर सॅनिटायझर वापरावा. हा सॅनिटायझर अल्कोहोल-आधारित असावा आणि त्यात किमान ६०% अल्कोहोल असावे.

खोकताना आणि / वा शिंकताना काळजी घ्या

खोकताना आणि / वा शिंकताना रुमाल, टिश्यू पेपर वा किमान आपल्या हाताचा पंजा तोंडापुढे धरावा. वापरलेला टिश्यू पेपर थेट कचऱ्यात टाकावा. रुमाल वारंवार धुवावा. आणि दर खोकण्या/शिंकण्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.

विनाकारण संपर्क टाळा

ज्या लोकांना बरे वाटत नाहीये अशा लोकांशी विनाकारण संपर्क टाळावा.

चेहरा जपा

हात न धुता चेहऱ्याला स्पर्श करू नका. विषाणू तुमच्या डोळ्यांतून, नाकातून, आणि तोंडातून शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे कुठल्याही अनोळखी वस्तूला स्पर्श केल्यावर चेहऱ्याला स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ करा. डोळे आणि / वा नाक अनाहूतपणे चोळण्याची अनेकांना सवय असते. त्यामुळे हात स्वच्छ करणे आणि ठेवणे गरजेचे आहे.

पुरेशी झोप घ्या

पुरेशी झोप घ्या. जर बरे वाटत नसेल तर शक्य तेवढा काळ विश्रांती घ्या. विश्रांती तुमच्या शरीराला ताजेतवाने करण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी आवश्यक आहे. पुरेशी झोप झाल्यास प्रतिकारशक्ती वाढते.

घाबरू नका

घाबरून जाऊ नका. तुम्ही जर विषाणूच्या संपर्कात आलेला नसाल तर कुठल्याही सर्दी-खोकल्याने घाबरून जाऊ नका. विश्रांती घ्या, लक्षणांवर लक्ष ठेवा आणि गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.

वरील लेख या लेखावर आधारित आहे.

%d bloggers like this: