औषधाविना आरोग्य – १

डॉ. सुधीर काटे विज्ञान केंद्राचे हितचिंतक आहेत. त्यांनी “औषधाविना आरोग्य” या विषयावर मांडलेले विचार क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत.

हिताहितं सुखं दु:खं आयुस्तस्य हिताहितम। मानं च तच्च यत्रोक्तं आयुर्वेद: स उच्यते।।

आयुर्वेद म्हणजे काय ?

आयुर्वेद म्हणजे काय ? हे वरील श्लोकात सांगितलेलं आहे. हित आणि अहित, सुख आणि  दुःख म्हणजे काय? आयुष्यासाठी हितकर-अहितकर काय ? तसेच त्याचे प्रमाण काय ? याचे ज्यात वर्णन केले आहे, त्यास आयुर्वेद म्हणतात.आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद. साहजिकच स्वतःचे हित कशात आहे हे जर  मानवास पक्के लक्षात आले आणि त्याप्रमाणे  त्याने तसे आचरण ठेवले, तर त्याचे पूर्ण आयुष्य अतिशय समाधानकारक होईल. हितकारक व्यवहार केले की जीवनात सुखच सुख आणि अहितकारक  व्यवहार केला की दुःख हे ठरलेले आहे. सुज्ञांस ते नक्की लक्षात येईल.

गरज आणि समज

अन्न,वस्त्र आणि निवारा या आयुष्याच्या अत्यावश्यक गरजा आहेत.  दैनंदिन जीवनात,अगदी जन्मापासून मानवाला आपल्या गरजा समजतात. भूक लागली की रडणे हे तर अगदी तान्हुल्यालाही समजते. आईच्या कुशीसारखा सुखदायी निवारा नाही आणि वस्त्रांची गरज तर अंगडं-टोपड्यापासून पुरवली जातेच,  तशी काळजी घेतली जाते. जसजसं वय वाढत जातं तसतशी समज येऊ लागते.आणि मानव तसा बदलू लागतो. चांगलं वाईट समजू लागतं. खरंतर मानव म्हणण्यापेक्षा सर्व सजीवच आपापला अनुभव वापरून जीवनाच्या कालचक्राची मार्गक्रमण करु लागतात. बुध्दी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. त्यामुळे हिताहित, सुखदुःख मानवास समजतं आणि त्यानुसार व्यवहार केले जातात.

औषधाविना आरोग्य

औषधाविना आरोग्य शक्य होऊ शकेल पण ते सहजसाध्य नाही.  रोजच्या आहारविहारातील सवयींचा जीवनमानावर परिणाम होतच असतो. आहार म्हणजे खाण्यास योग्य असे पदार्थ आणि विहार म्हणजे रोजच्या करावयास लागणाऱ्या हालचाली. आहार आणि विहार यांचा ताळमेळ बसणे महत्वाचे असते.  ते जमले की जीवन जगणे आनंदाचे होते. पण हो…ह्यामधे आपलं मन हे खोड्या करत असतं. ह्याला सांभाळणं तसं अवघड असतं. त्याबद्दल आणि अशा अनेक बाबतीत आपण क्रमशः बोलूच.

डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.

%d bloggers like this: