औषधाविना आरोग्य -3

वेगान्न धारयेद्वातविण्मूत्रक्षवतृटक्षुधाम् |निद्राकासश्रमश्वासजृम्भाश्रुछर्दिरेतसाम् ||
रोग उत्पन्न होऊ नये, आजारपण येऊच नये यासाठी  पाळावयाचे काही नियम सांगितलेले आहेत. त्या नियमांचे व्यवस्थित पालन केल्यास रोग निर्माण होण्यास प्रतिबंध होऊ शकतो आणि आरोग्य निर्मितीला सहाय्य होऊ शकते.

वेग

वरील श्लोकाच्या सुरुवातीला ” वेग ” म्हणजे “विशिष्ट शारीरिक  संवेदना”, ज्या कधीही रोखून धरू नयेत, अन्यथा त्यांचे दुष्परिणाम म्हणून शरिरात काही वाईट लक्षणे दिसू लागतात.
अशा १३ संवेदना (वेग) वरील श्लोकात शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत.त्यातील “वात” म्हणजे वायू, मलविसर्जन, मूत्रविसर्जन, शिंकणे, तहान, भूक,  निद्रा, खोकला, श्रमश्वास, जांभई, दुःख किंवा आनंदाचे अश्रू, उलटी आणि वीर्य असे तेरा वेग अधारणीय आहेत. चरकाचार्यांनी १४ वा ” ढेकर ” हा वेग सांगितलेला आहे.

धारण करणे म्हणजे रोखून ठेवणे, धरुन ठेवणे,अडवून ठेवणे. हे सर्व वेग, संवेदना ‘अधारणीय’ म्हणजेच रोखू नयेत, धरून ठेवू नयेत.या वेगांना धारण केल्यास , म्हणजे, यांची इच्छा होत असल्यास ती इच्छापूर्ती  होऊ दिली नाही तर शरिरात त्रासदायक लक्षणे निर्माण होतात. त्रासदायक लक्षणांमुळे रोजच्या कामात, अभ्यासात अडथळे येतात. लघवीच्या मार्गाचे रोग निर्माण होण्यासही ते कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे वरील चौदा संवेदनांचे नेहमी लक्ष देऊन, लगेच त्यांचे निराकरण करावे.

उदाहरण

उदाहरणादाखल “मूत्रविसर्जन” या संवेदनेबद्दल माहिती देत आहे. मूत्रविसर्जन म्हणजे लघवीला जावेसे वाटणे. लघवीची संवेदना वाटल्यास लगेच, लघवी करून यावे अन्यथा पोट दुखणे, घाम येणे अस्वस्थ वाटणे, कशात लक्ष न लागणे, भूकही न लागणे, थरथर होणे, मूत्रमार्गाचे आजार, मुतखडा इ. निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जेंव्हा लघवी येईल तेव्हा ताबडतोब लघवी म्हणजे मूत्रविसर्जन करून यावे, म्हणजे पुढे निर्माण होणारी लक्षणे होणार नाहीत आणि औषधेही घ्यावी लागणार नाहीत.
बऱ्याच वेळा आलेल्या लघवीस प्रतिबंध केल्यास, त्यावेळी लक्षणे दिसतातच, परंतु कालांतराने निर्माण होणारी आणि पुढे आयुष्यभर त्रास, वेदना देणारी लक्षणेही निर्माण होऊ शकतात. आनंदाने चालणाऱ्या जीवनक्रमात  त्यामुळे अडथळा येतो आणि आपल्याबरोबर कुटुंबासही ते त्रासदायक होते म्हणून वरील चौदा  संवेदनांचा प्रतिबंध करू नये. त्यामुळे पुढे होणारे त्रास वाचतील शिवाय सद्यस्थितीतही मोकळेपणा आनंद मिळू शकतो.

आज काल…

तहान, भूक या संवेदनाही आज-काल अतिशय दुर्लक्षित केल्या जातात. झोपेच्या वेळेतही अनियमितपणा वाढलेला आहे. त्यामुळे अनेक तरुण मुला-मुलींना विविध त्रासदायक लक्षणांना सामोरं जावं लागतं. थोडं जर शरीराकडे लक्ष दिलं तर पुढे होणारे त्रास कमी होऊ शकतात. स्वतःकडेही प्राधान्याने लक्ष द्यावे म्हणजे पुढील काम जास्त उत्साहात,आनंदात,व्यवस्थित पार पडेल आणी औषधाविना आरोग्याकडे जाणारी वाट सुकर होईल.

डॉ.सुधीर अनंत काटे, निगडी,पुणे

%d bloggers like this: