औषधाविना आरोग्य – ४

रोग किंवा आजार निर्माणच होऊ नयेत यासाठी काही गोष्टींचं पालन करणं जरुरीचंच आहे. आजार,रोग निर्माण होण्यासाठी काय कारणीभूत असतं, याची माहिती  यावेळी देत आहे. 

रोग-निर्मितीची तीन कारणे

 1. काळ (काल)
 2. इंद्रियांचे विषय, आणि
 3. कर्म
  या तीन गोष्टी रोग-निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात.  या तीन गोष्टी जर आपण सांभाळू शकलो तर आजारपण निर्माण होणे केवळ अशक्य आहे.

काल किंवा काळ

“काल” किंवा “काळ ”  या रोग निर्माण होणा-या हेतूविषयी यावेळी सांगणार आहे. काळ म्हणजे आपले तीन ऋतू .
उन्हाळा, हिवाळा ,  पावसाळा यांच्या कमी-जास्तपणावर अवलंबून असणारे आजार.  काळाच्या हीनयोग, अतियोग आणि विषमयोग म्हणजेच कमी-जास्त प्रमाण होण्यावर रोगाची उत्पत्ती अवलंबून असते.
उदाहरणार्थ पावसाळा हा ऋतू आपण घेऊ. पावसाळ्यात जर पाऊस अती प्रमाणात झाला तर तो पावसाचा ‘अतियोग’ होतो. पाऊस जर कधी कमी, कधी जास्त असा पडला तर तो त्याचा ‘विषमयोग’, तसेच पाऊस जर अजिबात पडला नाही,म्हणजे दुष्काळ आला तर त्यास पावसाचा ‘हीनयोग’असे म्हटले जाते.
पावसाच्या अतियोगाने म्हणजेच पाऊस खूप पडल्याने ‘ओला दुष्काळ’ अशी परिस्थिती येते. पिकांची नासाडी होते. अती ओलाव्याने बुरशीजन्य आजार, अंगाला खाज, बोटांमधे चिखल्या होणे, थंडीताप, सर्दी खोकला, सांधेदुखी  इत्यादी आजार होऊ शकतात. जर आपण आपली काळजी घेतली नाही तर…

काळजी घेणे म्हणजे काय ?

काळजी घेणे म्हणजे..

 • गरम पाणी पिणे
 • गरम पाण्याने गुळण्या करणे
 • पावसात न भिजणे
 • पाऊस असल्यास बाहेर जाताना छ्त्रीचा वापर करणे,  रेनकोट घालणे.
 • जास्त गारवा असेल तर गरम कपडे घालणे किंवा गरम पाण्याचा यथायोग्य वापर करणे,शेक घेणे.
 • आइस्क्रीम वगैरे गार पदार्थ न खाणे

असे उपाय खबरदारी म्हणून केल्यास पावसाळ्यात आजार उत्पन्न होणार नाहीत आणि विपरीत परिस्थितीतही तब्येत छान राहील,आरोग्य टिकून राहील.
डॉ.सुधीर अनंत काटे
निगडी,पुणे

%d bloggers like this: