औषधाविना आरोग्य – ६

शरीर सुस्थितीत राहण्यासाठी रोज खाणे आणि पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याबरोबरच दूध, ताक, सरबत, लस्सी इ. द्रवपदार्थही जरूरीचे आहेत. आपण रोज जो ‘आहार करतो’ म्हणजेच ‘खातो’ किंवा काही पातळ पदार्थ पीत असतो.  ते खाताना अथवा पिताना आवडले, तरच आपण खातो किंवा पितो. हे ‘आवडणे’ यालाच ‘चव’ असे म्हणूया. आपण जे रोज खातो त्यालाच  ‘आहार ‘ असे म्हणतात. त्या आहाराची,पदार्थांची चव जर आवडली तरच आपणही ते पदार्थ आनंदाने खातो. ही आवडनिवड चवीवर अवलंबून असते.

चव आणि षड्रस

ह्या आहाराचे किंवा खाण्याच्या पदार्थांचे रस (चवी) प्रामुख्याने सहा प्रकारचे आहेत.त्यांनाच ‘षड्रस’ असेही म्हटले जाते.हे सहा आहाराचे रस शरीराला आणि जिभेला (पदार्थ आवडायला) जरुरीचे असतात.ह्या सहा रसांवरच आपला आहार अवलंबून असतो.चव चांगली लागली की आपण पदार्थ जास्त खातो,जास्त पितो.
हे सहा आहाराचे रस खालील प्रमाणेः

  1.  मधुर (गोड)
  2. अम्ल(आंबट)
  3. लवण (खारट)
  4. कटू (तिखट)
  5. तिक्त (कडू)
  6. कषाय(तुरट)

असे आहेत. वरील सहाही रसांचा शरीर वाढीसाठी, आरोग्य टिकून राहण्यासाठी उपयोग होत असतो. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये सहाही रसांचा म्हणजेचे सहाही चवींच्या पदार्थांचा कमी जास्त प्रमाणात उपयोग करावा. त्यामुळे मनाला आनंद मिळेलच शिवाय शरीर अवयवांना त्याचा फायदा होईल. ठराविक चवीचे पदार्थ, रसाचे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य बिघडू शकते.
“मधूर ” म्हणजेच “गोड” या रसाचे, चवीचे पदार्थ साखर, गूळ घातलेले, सर्वांनाच जास्त आवडतात. तिखट चवीचे पदार्थ,ज्यात मिरची,कांदा,लसूण,आले मिसळलेले असतात,असे खमंग पदार्थही मिटक्या मारत आवडीने खाणारे अनेक जण असतात. आंबट चवीची फळे, ताक, दही इ.पदार्थ म्हणजे ‘अम्ल’ रसाचे पदार्थ ही जेवणात असावेत. लवण म्हणजे खारट, मिठाची चव खारट, मिठाशिवाय तर जेवण जाणारच नाही. तुरट रस अगदीच कमी प्रमाणात खावा. कढीपत्ता, कोथिंबीर तसेच काही भाज्याही किंचित तुरट चवीच्या असतात. तीक्त म्हणजे कडू. कारले,मेथी कडू चवीच्या असतात. म्हणजेच जेवणात सर्व रसांचे खाणे आपल्या नकळत होतेच. तरिही न चुकता सर्व चवींचे पदार्थ खाल्ले जातात ना ह्याकडे लक्ष असावे.

अतिरेक टाळा

पण,अती प्रमाणात,आवड म्हणून एखाद्या रसाचे पदार्थ जास्त खाल्ले, तर शरीरास त्रास होऊ शकतो. अमुक एखाद्या चवीचे पदार्थ, रसाचे पदार्थ खाल्ल्याने त्रास होत असेल तर ते पदार्थ टाळणे जरुरीचे आहे आणि हे ज्याला त्याला समजून येत असते. शरीर तशी सूचनाही देत असते. ती सूचना लक्षात घेऊन ज्याने त्याने त्या रसाचे, त्या चवीचे पदार्थ कमी प्रमाणात खावे म्हणजे कुठलाही त्रास होणार नाही.
प्रत्येक रसाचे गुणधर्म आणि शरीरासाठी उपयोग सांगितलेले आहेत. अती प्रमाणात सेवन केल्यावर होणारे त्रासही सांगितलेले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने, मार्गदर्शनाने ते समजून घेऊन आपला आहार नियमित सर्व रसांचा, चवींचा असावा आणि निरामय, रोगरहित आयुष्याचा आनंद घ्यावा.
-डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे-४४.

%d bloggers like this: