औषधाविना आरोग्य – ८

आहार

रोज आपण जे खातो त्यास आहार असे म्हटले जाते आणि ते शरिरासाठी उपयुक्त असे असते.  निरामय आरोग्यासाठी सर्व शरीरोपयोगी घटकांचा अंतर्भाव असलेले अन्न म्हणजे आहार होय.  निरामय, रोगरहित आयुष्यासाठी आणि शरिराच्या योग्य वाढीसाठी आहार घेणे गरजेचे असते. सृष्टीवरील सर्व सजीवांना आहाराची, जिवंत राहण्यासाठी आवश्यकता असते.

पंचकर्मेंद्रिये आणि पंचज्ञानेंद्रिये, शरीरातील इतर अवयव आणि मन यांच्या सुदृढतेसाठी अन्नपदार्थ खाणे आवश्यक असते. कुठलाही सजीव खात नाही असे होत नाही. सजीव खातात त्यास  अन्न  म्हटले जाते आणि त्यासच आहार म्हटले जाते.

केव्हा खावे

केव्हा खावे याचेही काही नियम, काही शास्त्र आहे. त्या नियमाला धरून अन्न खाल्ल्यास ते शरीराला पोषक ठरते. हे नियम तसे बरेच आहेत. परंतु ढोबळ मानाने आज त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे.

भूक लागल्यावरच अन्न खावे म्हणजेच आहार घ्यावा. रोजच्या सवयीप्रमाणे प्रत्येकाच्या आहाराच्या पद्धती आणि वेळा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे अमुकच पद्धती असावी असा शक्यतो हट्ट धरू नये. वेळेच्या बाबतीत विचार केला तर, शरिराने आपल्याला संवेदना दिलेल्या आहेत.  भूक लागणे ही संवेदना निर्माण झाली की आहार घ्यावा म्हणजेच खाऊन घ्यावे असा नियमच आहे.  आता,ही भुकेची संवेदना प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकते. त्याला त्याचे शरीर कारणीभूत असते. परंतु, साधारणतः निसर्ग-नियमाप्रमाणे मनुष्याला दुपारी आणि रात्री भूक लागते. हा सुद्धा नियम नाही. काहीजण २४ तासात एकदाच खाणे, असेही करू शकतात तर काहीजणांना दर तीन चार तासांनी भूक लागू शकते. भूक लागते अशावेळी भूक ही संवेदना टाळू नये. लगेच,  शरिराला त्रास होणार नाहीत असे अन्नपदार्थ खाऊन घ्यावेत.

भुकेच्या संवेदना

भूक लागली की ते प्रत्येकाला लक्षात येते. याची साधारणपणे पुढील प्रमाणे लक्षणे असतात.

  • बरगड्यांच्या खाली पोटात खड्डा पडल्याप्रमाणे वाटते
  • त्या ठिकाणी आग पडल्यासारखे जाणवते
  • चक्कर आल्यासारखे वाटते
  • डोके दुखू लागले
  • काही करू नये अशी जाणीव होते
  • कुठल्याही कामात लक्ष लागत नाही.
  • अकारण चिडचिड होणे हे एक महत्वाचे लक्षण आहे.

अशा प्रकारची विविध लक्षणे प्रत्येकाला भूक लागली की जाणवतात. अशी लक्षणे जाणवल्यास लगेच खाऊन घ्यावे म्हणजेच आहाराचे सेवन करावे. शरिराला आणि मनाला  तरतरीतपणा आणि आनंद द्यावा.

डॉ.सुधीर अनंत काटे, निगडी ,पुणे

%d bloggers like this: