औषधाविना आरोग्य – ९

वर्षाऋतुतील आहार विहाराबद्दल या लेखात डॉ. सुधीर काटे आपल्याला बहुमोल माहिती सांगत आहेत.

पावसाळा म्हणजे वर्षा ऋतू. सगळीकडे पाणीच पाणी असते. झाडे,वेली,जमीन,प्राणी,पक्षी सगळे तृप्त असतात. आनंदी आनंद असतो.

काय खावे

पण नुकताच उन्हाळा गेल्यामुळे माणसाची भूक मंदावलेली असते आणि तशीच ती मंदावलेली पुढेही वर्षा ऋतूत चालू राहते. नीट भूक लागत नाही. त्यामुळे जेवण जात नाही, अल्पसा थकवा जाणवू शकतो. उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पिण्याची सवय असते ती पावसाळ्यात कमी होते. तहान कमी लागत असल्यामुळे शरिरात पाणी ही कमी जाते. एकंदरीत शारीरिक, पर्यायाने मानसिक अस्वस्थता असते. आपल्याकडे धान्य साठवून ठेवण्याची पध्दत पिढ्यान्-पिढ्या चालू आहे. त्यामुळे, या आधी साठवलेल्या धान्याचा उपयोग ऐन जरुरीच्या वेळी करता येतो.  पावसाळ्यात जुने तांदूळ हितकारक असतात.  जुन्या तांदळाचा भात, खिचडी, तांदळाची पेज, दूधभात असे पदार्थ पावसाळ्यात नियमित घ्यावेत. गव्हाचे ही विविध प्रकार आणि पदार्थ अवश्य करावेत. चपाती,पुऱ्या,पराठे, गव्हाची गरमगरम खीर अशा पदार्थांना रोजच्या जेवणात अवश्य स्थान द्यावे.

काय प्यावे

” यूष ” म्हणजेच विविध प्रकारचे सूप प्यावेत. गरमगरम चमचा चमचा करत , हळुहळू त्या सूपांचा आस्वाद घ्यावा. उकडलेल्या डाळींचे पाणी, डाळींचे सूप, मूग-मसूर  आदी धान्यांचे सूप शरीरास  बल देण्यास  उपयोगी पडतात.  शक्य झाल्यास  त्या सुपांमध्ये  जिरे,मोहरी,आलं,लसूण  असे पचनाला सहाय्य करणारे,  सुपाची, पदार्थांची चव, लज्जत  वाढवणारे पदार्थ  टाकल्यास अन्न पचन हा फायदाही होतो.
मांसाहारी लोकांनी विविध प्रकारांचे मांस सूप अवश्य घ्यावे. त्याच्यामुळे भूक लागून जेवण भरपूर जाते शिवाय भरपूर जेवलेल्या अन्नाचे पचनही होऊन जाते.

वरण-भात,भाज्या,चपाती,भाकरी असे पदार्थ वर्षा ऋतू मध्ये रोजच्या जेवणात नियमित असावे. हलका आहार,पचनास हलके असे पदार्थ ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार,अनुभवानुसार घेणे जरुरीचे आणि फायद्याचे असते. पावसाळ्यात गारवा असल्यामुळे भूक हळूहळू वाढतही जाते. त्याप्रमाणात आहारही घेणे गरजेचे असते. स्निग्धता असणारे पदार्थ म्हणजे तूप,तेल शेंगदाणे,तीळ असे पदार्थ शक्यतो भोजनात असावेत किंवा खाल्ले जावेत. जेवण किंवा जे काही खाल्ले जाईल ते ही गरम गरम असणे पचनासाठी आणि शरीर वृद्धीसाठी उपयोगी असते. पावसाळ्यात शक्यतो आंबट पदार्थ मनाला, जिभेला जास्त आवडतात त्यामुळे आंबट आणि मीठ खाणे पावसाळ्यात हितावह असते.

द्राक्षासवादी आसवांचाही वापर पावसाळ्यात आवर्जून करावा. पावसाचे स्वच्छ पाणी पिण्याचा आनंद घ्यावा. अन्न खाताना किंवा काही पेय द्रवपदार्थ घेताना त्यामध्ये मधाचा वापर करावा.  त्याचे प्रमाणही प्रकृतीला मानवेल इतके ठरवून घ्यावे . द्राक्षासव व इतर प्रकारची आसवे भूक वाढीसाठी, पचनासाठी आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी रोज घ्यावीत. त्यासाठी वैद्याचा सल्ला घ्यावा.

इतर आचरण

  • आपल्या घरात, आपला भोवताल गरम असेल अशा ठिकाणी बसावे. शेगड्या, शेकोटी पेटवून वातावरण उबदार बनवून त्यात बसावे.
  • “अंग मर्दन ” म्हणजे अंग चोळून घेणे.”मसाज करणे” हे पावसाळ्यात जास्त हितावह असते. त्यामुळे शरीर हलके होऊन शरिराला तुकतुकी येते.
  • विविध प्रकारची सुगंधी चूर्णे,उटणे शरिराला चोळावीत. त्याने प्रफुल्लितपणा राहतो. न चुकता रोज स्नान करावे. स्नानाचे गुणधर्म,फायदे हे आपणा सर्वांना माहीत आहेतच.
  • पावसाळ्यात दिवसा अजिबात झोपू नये. ते शरिरास हितावह नाही.
  • पावसाळ्यात नदीचे पाणी, आहे तसेच, अजिबात पिऊ नये. कारण त्यात माती आणि इतर कचरा मिसळलेला असतो. ते पाणी स्वच्छ आणि शुद्ध आणि शक्य झाल्यास उकळून प्यावे म्हणजे काही दुष्परिणाम होणार नाहीत.
  • रस्त्यांमध्ये पाणी साठलेले असते.  निसरडे झालेले असते. पाय घसरण्याची शक्यता असते. पायाला चिखल माती लागून कातडीला त्रास होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात  किडा,मुंगी,सर्प, विंचू  इत्यादी मानवाला त्रास होऊ शकेल असे प्राणी  जमिनीवर जास्त आलेले असतात.  त्यामुळे  शक्यतो चालण्याचे टाळावे वा लक्षपूर्वक चालावे. त्यापेक्षा पायी हिंडणे टाळावेच.
  • पावसाळ्यात व्यायामही टाळावा. कधीकधी पाऊस नसतो आकाशही निरभ्र असते. त्यामुळे सूर्याचे प्रखर किरण पृथ्वीवर पडलेले असतात. उगाच अशा प्रखर उन्हामध्ये जाऊ नये, फिरू नये त्याने त्रास होण्याची शक्यता असते.
  • गार वाऱ्यापासून  स्वतःचे संरक्षण करावे  उगाच गार हवेत फिरू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने शरीरोपयोगी पंचकर्मे करून घ्यावीत.

 डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.

%d bloggers like this: