आरोग्य म्हणजे काय ?

समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियाः। प्रसन्नात्मेन्द्रियमनः स्वस्थ इत्यभिधीयते ॥ (२५-५१, सूत्रस्थानम्, सुश्रुतसंहिता)

आरोग्य म्हणजे काय ? याची व्याख्या आयुर्वेदाने  वरील श्लोकामध्ये सांगितलेली आहे.

त्यातील स्वस्थ  म्हणजे आरोग्य  असे आपण समजावयाचे आहे. त्या श्लोकातील  प्रत्येक शब्दाचा अर्थ मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. पहिला शब्द ” समदोष ” म्हणजे शरीरातील वात पित्त आणि कफ हे ” सम ” असणे म्हणजे समान स्थितीत असणे. त्यांचे शरीरातील प्रमाण जेवढे हवे तेवढेच आणि व्यवस्थित असणे.

  • वात म्हणजे, थोडक्यात, शरिरातील सर्व हालचाली.
  • पित्त म्हणजे शरिरातील पचनाच्या क्रिया ज्या द्वारे केल्या जातात, त्यास साधारणतः पित्त म्हणता येईल.
  • कफ म्हणजे शरिरातील पाण्याचे,ओलाव्याचे प्रमाण.

ते जर समान प्रमाणात असतील म्हणजे त्यांच्या वाढणे आणि कमी होण्यामुळे शरिराला काही त्रास होणार नाही, अशा प्रमाणात असतील तर त्यास समदोष असे म्हणावे “समाग्नि ” हा दुसरा शब्द. “सम “आणि “अग्नी” असे दोन शब्द आहेत. अग्नि म्हणजे शरिरातील पचनादि क्रिया ज्याद्वारे केल्या जातात. त्यास “” अग्नि ” असे म्हटले जाते. हे अग्नी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. उदा.जाठराग्नी (पोटातील अन्नाचे पचन ह्यामुळे होते.)

पुढचा शब्द आहे “समधातू”. म्हणजे शरिरातील रस, रक्त मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे धातू योग्य प्रमाणात असणे.

पुढील शब्द आहे  ” मलक्रिया “. याचा अर्थ  शरिरातून बाहेर पडणारे घाम, लघवी आणि आणि पुरीष (संडासवाटे पडून जाणारे) यास मलक्रिया असे म्हटले जाते.  यामध्ये काही बिघाड नसणे.

तसेच ” प्रसन्न आत्म ” म्हणजे स्वतःला खूप छान वाटणे, झोप खूप छान लागणे आणि आनंदी वाटणे यासच “प्रसन्न आत्म ” म्हणजेच प्रसन्न आत्मा असे म्हटले जाते.

त्यापुढील शब्द आहे इंद्रिये म्हणजे, पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये

  • पंचकर्मेंद्रिय : वाणी, हात ,पाय ,जननेंद्रिय, गुद
  • पंचज्ञानेंद्रिय : कान ,नाक ,त्वचा ,डोळे ,जीभ

वरील इंद्रियांची कार्ये सुस्थितीत असतील आणि आपले ” मन ” कुठल्याही  चुकीच्या विचारांनी भरलेले नसेल. अशावेळी  या व्यक्तीला   “स्वस्थ ”  म्हणजे  “आरोग्य “असलेली व्यक्ती असे म्हटले जाते.

प्रत्येकाने रोज रात्री झोपताना असा विचार करावा “आज मला काही त्रास नाही ना? मी कोणाला काही त्रास दिला नाही ना? मी सुखी आहे ना ? मी कोणाला दुःखी केले नाही ना ? याची उत्तरे मनाला समाधान  देणारी असतील तर समजावे.आपले आरोग्य ठणठणीत आहे. आपल्याला काहीही त्रास नाही आणि हे आरोग्य टिकवण्यासाठी जे काही नियम सांगितलेले आहेत. त्यांचे नियमित पालन करावे आणि मिळालेल्या आयुष्याचा छानपणे,आनंदाने उपभोग घ्यावा.

‘a state of complete physical, mental and social wellbeing and not merely the absence of disease or infirmity’. ( WHO, 1948).

आरोग्य आणि स्वास्थ्य यांची व्याख्या करताना, जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) ही व्याख्या केली आहेः केवळ रोग वा दौर्बल्य यांचा अभाव नव्हे तर,  संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वस्थता म्हणजे आरोग्य असे १९४८ सालीच म्हटले होते. आयुर्वेदाने कित्येक शतकांपूर्वीच हे विचार मांडलेले दिसतात.

डॉ.सुधीर अनंत काटे निगडी,पुणे.

%d bloggers like this: