विज्ञानदूत

सुमारे पाच वर्षांपूर्वी मराठीतून “विज्ञानदूत” हे विज्ञान विषयक मासिक मी एक वर्ष चालवले. सोळा छोट्या रंगीत पानात विविध वयोगटातल्या लोकांना आवडेल असा हा अंक मी केवळ दहा रुपयांत (वार्षिक वर्गणी रु. ११०) देत असे. यातील दहा अंक pdf रूपात पुढे दिले आहेत. विज्ञान मराठीतून वाचायला तुम्हाला आवडेल असे वाटते.

dootjan11

dootOct10

dootSept10

doot_june10

Aug10

doot july10

dootDec10

dootApril11

dootmarch2011

dootNov10

फ्री सॉफ्टवेअर विशेषांक

 

शब्दशक्ती

सुमारे पाच वर्षांपूर्वी मराठीतून “विज्ञानदूत” हे विज्ञान विषयक मासिक मी एक वर्ष चालवले. 

View original post 46 more words

जी.एन्.यू. लिनक्स

अनपेक्षित यशस्वी झालेला संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रातला प्रयोग असं लिनक्सचं वर्णन करण्यात येतं. त्या लिनक्स विषयी थोडेसे.गेली सुमारे वीस वर्षे मी लिनक्स आणि फ्री डॉस या संगणक प्रणाली वापरत आलो. सध्या मी उबंटू वापरतो. उबंटू हा लिनक्स या कार्यकारी प्रणालीचा एक स्वाद आहे. असे अनेक स्वाद (जूज, मँड्रिव्हा, रेड हॅट, फेडोरा, डेबियन, स्लॅकवेअर)  लोकप्रिय आहेत. या लेखात लिनक्स (म्हणजे या सर्व स्वादांचा गाभा) आणि मुक्त प्रणालींविषयी जास्त माहिती देत आहे.

लिनक्स ही काही केवळ एक संगणक प्रणाली नाही. ती एका जागतिक चळवळीचा महत्वाचा भाग आहे. सारे जग एकाच अर्थधर्माचे पालन करत असताना, संगणक हा त्यातला महत्वाचा घटक बनला आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. या अतिमहत्वाच्या घटकावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांनीही धसका घ्यावा असे तत्वज्ञान लिनक्स मागे आहे.

ज्यावेळी संगणक क्षेत्रात घडवल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्मितीची केवळ दामदुप्पटच नव्हे तर कैक पट वसुली करण्याची पद्धत होती, त्यावेळी मुळच्या फिनलंडच्या आणि नंतर अमेरिकास्थित लिनस टोरवाल्ड्स या संगणक तज्ञाने मोठ्या संगणकावर वापरल्या जाणाऱ्या युनिक्स या कार्यप्रणाली सारखी ताकदवान आणि तिच्याशी नाते सांगणारी नवी प्रणाली व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली…. खरे तर त्याचा गाभा तयार केला. आणि इंटरनेट वरून तो इतरांसाठी खुला केला. जगभर पसरलेल्या संगणक तज्ञांना तो आवडला. नंतर त्यांनी त्या गाभ्यावर अवलंबून अशी कार्यकारी प्रणाली जन्माला घातली. वाढवली. आता या बाळाने चांगलेच बाळसे धरले आहे.

tux1
लिनक्सचे चिन्ह

त्याही आधी रिचर्ड एम्. स्टॉलमन या संगणकतज्ञाने असा विचार मांडला की प्रत्येक संगणक प्रणाली मुक्त असायलाच हवी. हा विचार त्याने मग त्याच्या फ्री सॉफ्टवेअर फौंडेशन या संस्थेमार्फत जगभर पसरवला. या विचारांमधील मूळ तत्व असे की प्रत्येक प्रणाली व त्यातील प्रोग्राम्स सर्वांना वाचण्यासाठी, कॉपी करण्यासाठी , वापरण्यासाठी आणि बदल करून सुधारणा करण्यासाठी खुले असायलाच हवेत. हा खुलेपणा-स्वातंत्र्य ‘ फ्री ‘ या शब्दात अभिप्रेत आहे.

ग्नू चे चिन्ह

तलवारी पेक्षा तराजू बरा या न्यायाने नवनिर्मिती, उत्पादन व विक्री याचा वापर इतरांवर ताबा मिळवण्यासाठी करण्याचे तंत्र, यंत्रसंस्कृतीने रुजविले आणि बाजाराचे रूपांतर रणांगणात केले. अशा काळात उत्पादनाच्या वापरकर्त्याला ते उत्पादन बनवण्याची प्रक्रिया सांगून टाकून, त्याची इच्छा आणि कुवत असेल तर त्या उत्पादनात बदल, सुधारणा करण्याचे स्वातंत्ऱ्य देणारे हे तत्वज्ञान स्टॉलमन यांनी मांडले. ज्या बाजारात एखादी वस्तू विकताना किंवा विकण्यासाठी दुसरी वस्तू फ्री म्हणजे फुकट देणारी फसवी युक्ती वापरली गेली, तिथेच फ्री या शब्दाचा दुसरा अर्थ – स्वातंत्र्य , निदान संगणकाच्या क्षेत्रात तरी प्रत्यक्षात आला आहे.

लिनक्स ही फ्री ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पण याचा नेमका अर्थ काय हे नीट समजून घेऊया. त्यासाठी संगणकीय क्षेत्रातल्या काही पारिभाषिक संज्ञांचा परीचय करून घ्यावा लागेल.

संगणक म्हणजे आपल्या समोर दिसणारा पडदा, कीबोर्ड, माऊस आणि त्याचा मेंदू. या मेंदूला मायक्रो प्रोसेसर म्हणतात. संगणकाच्या विविध भागांशी आणि वापरणाऱ्याशी संपर्क निर्माण व्हावा यासाठी आणि विविध कामे करणाऱ्या प्रणाली वापरता याव्यात म्हणून एक मूलभूत संगणक प्रणाली संगणकाच्या स्मृतिकक्षात भरावी लागते. ती कार्यकारी प्रणाली होय. प्राण्याचे पिल्लू, अगदी लहान असतानाही पहाणे , ऐकणे, हालचाल करणे, आवाज काढणे अशा अनेक प्राथमिक क्रिया करू शकते. या करण्यासाठी या पिल्लाकडे जी प्रणाली असते. तशीच संगणकाची कार्यकारी प्रणाली असते. एकदा या क्रिया करता यायला लागल्या की मग इतर गोष्टी ते पिल्लू शिकू शकते. नंतर शिकण्याच्या गोष्टींची तुलना आपल्याला संगणकात वापरल्या जाणाऱ्या इतर उपयुक्त प्रणालींशी करता येते. या प्रणालींना इंग्रजीत अँप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटले जाते. यात कचेरीत वापरल्या जाणाऱ्या ऑफिस सूट, हिशेब प्रणाली, चित्रे काढण्याची प्रणाली या सारख्या प्रणालींचा अंतर्भाव करता येईल.

संगणकाची एकूण परिणामकारकता त्यावरील कार्यकारी प्रणालीवर अवलंबून असते. जगभर प्रसिद्ध असलेली आणि अनेक ठिकाणी वापरली जाणारी विंडोज ही प्रणाली, अनेकांना ठाऊक असते. हल्लीच निरनिराळ्या कारणांमुळे लिनक्सचे नाव आपल्यापैकी अनेकांच्या कानावर आहे. साधारणपणे विंडोज वर ज्या ज्या गोष्टी करता येतात, त्या सर्व लिनक्स वर करता येतातच. पण अनेक बाबतीत लिनक्स जास्त सरस आहे. पूर्वी लिनक्स ही फक्त अभियंते आणि शास्त्रज्ञ यांनी वापरण्याची प्रणाली होती. माऊसचा कमी वापर आणि उपयोजित प्रणालींची कमी संख्या, आणि लोकप्रिय विंडोजच्या पेक्षा वेगळ्या आज्ञा या कारणांमुळे लिनक्स लोकाभिमुख झाली नाही. आता मात्र, गेल्या काही वर्षात जागतिक संगणकतज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या सर्व अडचणींवर मात करून लिनक्सने आपले प्रभावक्षेत्र प्रचंड वाढवले आहे.

“लिनक्समधे असे काय आहे की ज्यामुळे आम्ही विंडोजचा वापर बंद करून लिनक्स वापरावे ?” हा अनेकांचा प्रश्न असू शकतो. त्यातल्या अनेकांना आपल्या संगणकाबरोबरच “आणतानाच बसवून मिळालेली ” जागतिक दबदब्याची विंडोज प्रणाली वापरायला लायसेन्स लागते आणि त्यासाठी सुमारे ४-५ हजार रुपये जादा मोजावे लागतात याची कल्पनाच नसते. पण “तसे सगळेच तर करतात ” या सबबीवर या कडे दुर्लक्ष केले जाते. “तसे असेल तर मग आता पर्यंत आमच्यावर काहीच कारवाई का झाली नाही ?” या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर, लोकांनी ह्याच प्रणालीची फुकट का होईना पण सवय ठेवावी, नाहीतर आपला धंदा कोसळेल अशी भीती वाटणारी कंपनी आणि कारवाई करण्याचे अधिकार असणाऱ्या कुजलेल्या सरकारी संस्था हे आहे. पण त्यात फार न शिरता लिनक्स का वापरावे या प्रश्नाचे उत्तरआता आपण पहाणार आहोत.

लिनक्स वापरावे कारण त्याची संगणकावर प्रतिस्थापना करणाऱ्या सी.डी. मधेच ही प्रणाली इतरांना कॉपी करून देण्याचे स्वातंत्र्य देणारे लायसेन्स अंतर्भूत असते.

लिनक्स वापरावे कारण, लिनक्स स्थापना करण्याची सी.डी. आपल्याला कोऱ्या सी.डी. पेक्षा थोड्या जास्त किमतीत (सुमारे २५ ते १०० रु.) उपलब्ध होऊ शकते. किंवा तुमच्या मित्राकडून मोफत मिळू शकते.

लिनक्स वापरावे कारण ते वापरणे अवघड नाही फक्त थोडेसे वेगळे आहे.

लिनक्स वापरावे कारण ढोबळ मानाने पहाता त्याला व्हायरसचा त्रास होऊ शकत नाही.

लिनक्स वापरावे कारण ते महिनोन्महिने दिवस रात्र अविरत चालू शकते. ते स्थिर आहे. त्याच्या वरील प्रणाली सहजासहजी कोलमडून पडत नाहीत.

लिनक्स वापरणे अधिक सुरक्षित आहे कारण ते पारदर्शी आहे. या प्रणालीचे सर्व अंतरंग सर्वांना पहाण्यासाठी खुले आहेत. त्यामुळे कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट करणारी प्रणाली त्यात लपवणे अवघड आहे. आपण माहितीच्या जालात विहार करताना आपला संगणक इतर संगणकांना जोडलेला असतो. अशा वेळी ज्या प्रणाली पारदर्शक नसतात त्या वापरकर्त्यासाठी धोकादायक ठरू शकतात. विशेषतः संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळा व व्यक्ती, राष्ट्रीय संरक्षणाबाबतची गुपिते संभाळणारे संगणक, किंवा लहान मोठ्या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार अपारदर्शी प्रणाली वापरल्याने असुरक्षित असतात.

लिनक्स वापरावे कारण या प्रणालीत होणाऱ्या सुधारणा तत्परतेने आणि सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचतात.

लिनक्स वापरावे कारण जागतिक दर्जाच्या प्रणाली कशा लिहिल्या आहेत ते संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना समजू शकते. या विद्यार्थ्यांना विविध प्रणाली लिहिण्यासाठीची अवजारे ती प्रणाली प्रस्थापित करतानाच संगणकावर घेता येतात. ही अवजारे मुक्त आणि मुफ्त असल्याने त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणताही वेगळा खर्च करावा लागत नाही (किंवा चोऱ्या कराव्या लागत नाहीत).

संगणकाचा हा आत्मा असा जवळजवळ फुकट वाटणे कोणाला कसे परवडते हा प्रश्न अनेकांना पडू शकेल. जगभरातले लाखो संगणकतज्ञ आपापल्या (फारसे न आवडणारे काम असणाऱ्या) नोकऱ्या संभाळून घरी आल्यावर संगणकावर ही नवी निर्मिती करतात. त्यांचा पोटाचा प्रश्न सुटलेला असतो, पण निर्मितीचे वेड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी मुक्त आणि मुफ्त लिनक्सवर त्यांनी लिहिलेली प्रणाली अनेकांच्या उपयोगी पडू शकते. उपयुक्ततेत कणभरही कमी नसणारी ही प्रणाली, विकण्याची त्यांना इच्छा नसते किंवा तसली धडपड करण्याची त्यांची कुवत नसते वा त्यांना तेवढा वेळ नसतो. मग पडेल भावात कोणातरी बड्या दादाला (बिग ब्रदर) ती विकण्यापेक्षा लिनक्स मार्फत जगभरच्या लोकांनी ती वापरली यातच त्यांचा आनंद असतो.

लिनक्सचे यश दडले आहे ते ज्या परवान्याखाली ते वितरित केले जाते त्या परवान्याच्या (लायसेन्स) रचनेत. हा परवाना (GNU-GPL) या नावाने प्रसिद्ध आहे. या परवान्यातील कळीचा शब्द आहे स्वातंत्र्य. ही कार्यकारी प्रणाली वापरण्याचे, कॉपी करण्याचे, इतरांना वाटण्याचे, ती वाचून त्यात योग्य ते बदल करून सुधारणा करण्याचे आणि ती विकण्याचेही स्वातंत्र्य. विविध संगणकतज्ञांनी इंटरनेटवर ठेवलेल्या त्यांच्या (GNU-GPL परवाना असणाऱ्या) मुक्त निर्मिती, विविध कंपन्या उतरवून घेतात. त्या एकत्र करतात आणि नंतर विकतात. मोठ्या कंपन्या त्यांच्या कडून या प्रणाली विकतही घेतात. कारण मोठ्या कंपन्यात काम करणाऱ्या लोकांचा वेळ वाचवण्यासाठी मोठ्या कंपन्या लिनक्स कंपन्यांकडून अडचणी सोडवण्याची सेवा मिळवतात. असे घडते कारण (GNU-GPL) परवाना कशाचीही सक्ती करत नाही .अगदी प्रणाली फुकट वाटण्याचीही.

भारतीय संगणक तज्ञांचा यात काय सहभाग आहे ? काही माननीय अपवाद वगळता अगदी थोडासाच. भारतीय बुद्धिमत्ता सेवा क्षेत्रात थोडीशी पुढे आहे पण नव्या उपयुक्त प्रणाली लिहिण्यात मात्र नाही हे मान्य करावेच लागेल. म्हणूनच कमी किंवा शून्य खर्चाची पण अतिशय ताकदवान लिनक्स वापरून नव्या उपयुक्त प्रणाली लिहिणे आणि नंतरच्या सेवा दिल्या बद्दल युरो किंवा डॉलर मिळवणे हा मार्ग नक्कीच श्रेयस्कर ठरेल.

प्रणाली वापरण्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी लिनक्स कंपन्यांकडेच धाव घ्यावी लागते असेही नाही. जगभर चालू असणारे लिनक्स वापरणाऱ्यांचे गट (Linux User Groups) कोणाही लिनक्स वापरणाऱ्याला ही सेवा मोफत देतात. पुण्यात असा गट पुणे लिनक्स यूजर् ग्रुप (PLUG) या नावाने कार्यरत आहे. दोन हजार पेक्षा जास्त सदस्य असणारा हा गट लिनक्सचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण ना नफा या तत्वावर करीत असतो.

तुम्ही जेव्हा लिनक्स वापरता किंवा दुसऱ्याच्या संगणकावर बसवता, तेव्हा तो दुसरा, तुमचे गिऱ्हाइक बनत नाही .मित्र बनतो. लिनक्स वापरल्याने बड्या दादाच्या खोडावरचे तुम्ही बांडगूळ बनत नाही ते सहजीवन असते. लिनक्स वापरून तुम्ही एकाच कंपनीला जगात सर्वशक्तिमान आणि एकाच व्यक्तीला सर्वात धनवान बनण्यापासून थोपवू शकता.

उद्या येऊ घातलेल्या सर्वव्यापी संगणकविश्वात वसुधैवकुटुंबकम् हा मंत्र सांगणाऱ्या भारताला लिनक्स ही प्रणालीच सुयोग्य आणि श्रेयस्कर नाही काय?

(हा लेख उबंटू लिनक्स १२.०४ या लिनक्स प्रणालीचा आणि लिबर-ऑफिस या उपयुक्त प्रणालीचा वापर करून टंकलिखित केला आहे.)

 

शब्दशक्ती

अनपेक्षित यशस्वी झालेला संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रातला प्रयोग असं लिनक्सचं वर्णन करण्यात येतं. त्या लिनक्स विषयी थोडेसे.

View original post 1,336 more words

अंतर्गोल आरशाची सूर्यचूल

पेटी पद्धतीची सूर्यचूल अनेक ठिकाणी वापरली जाते. ती उपयुक्त आहेच. पण तिला खूपच मर्यादा आहेत.

 1. सूर्य ऊर्जा एकत्रित करण्यात पेटी पद्धतीची चूल तांत्रिक दृष्ट्या कमी कार्यक्षम आहे.
 2. उचलायला व सरकवायला (विशेषतः गृहिणींसाठी) अवजड आहे.
 3. अन्न शिजायला ३ ते चार तास लागतात.

अंतर्गोल अारशाची चूल वरील तीनही मर्यादांवर मात करू शकते. मात्र ती बिनचूक पद्धतीने बनवणे आवश्यक आहे. मी जी.एन्.यू. ऑक्टेव्ह या मुक्त संगणक प्रणालीचा वापर करून कोणत्याही आकाराचा सूर्यचूल आरसा तयार करण्याचा प्रोग्राम  लिहिला आहे. जिज्ञासू व्यक्तींनी तो वापरून कोणत्याही आकाराची अशी चूल बनवावी.

सरळ एकप्रतलीय पृष्ठभाग वापरून paraboloid करता येत नाही कारण तो त्रिमित आकार आहे. पण अनेक पाकळ्या वापरून त्या जोडल्या तर paraboloid च्या जवळ जाणारा त्रिमित आकार बनवता येतो. हा प्रोग्राम लिहिताना

 1. पाकळीवरील प्रत्येक बिंदू हा उभ्या parabola चा घटक आहे. आणि ,
 2. तोच बिंदू हा आडव्या रिंगचा (वर्तुळाचा) घटक आहे.

ही वस्तुस्थिती विचारात घेतली आहे.

तुम्ही हे करून पाहू शकता

ज्या व्यक्तींना हा प्रोग्राम वापरणे शक्य नाही त्यांच्या साठी, चार माणसांची भाजी-भात आमटी सुमारे १ तासात तयार करण्यासाठी जो आरसा लागेल. तो कसा तयार करायचा याची थोडक्यात कृती येथे देत आहे.

 1. कोणताही चकचकीत पृष्ठभाग (कागद, पुठ्ठा, स्टेनलेस स्टील पत्रा इत्यादि) विशिष्ट पद्धतीने कापून एक पाकळी बनवा. पाकळीची मोजमापे व आकार पुढे दिला आहे. मोठ्या आकारात पहाण्यासाठी आकृतीवर क्लिक करा. हा साधा त्रिकोण नाही हे ध्यानात घ्या.
 2. अशा ३६ पाकळ्या बनवा.
 3. प्रत्येक पाकळीवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे विशिष्ट उंचीपाशी विशिष्ट रुंदी असायला हवी. उदा. 18.36 से.मि. उंची असताना पाकळीची रुंदी 3.1 सें.मि.असायला हवी. किंवा 34.04 उंची असताना 5.43 सें.मि. रुंदी असायला हवी.
 4. या सर्व पाकळ्या एकमेकांना अशा जोडा की शू्न्य रुंदी असलेली टोके एकत्र येतील आणि सर्वात रुंदअसलेला भाग सर्वात वर असेल.
 5. अशा रीतीने तयार झालेला आरसा शेजारील छायाचित्रात दाखवला आहे. तुम्ही  त्याचा स्टँड तयार केला नाही तरी चालेल. कारण एका तासात सूर्य स्वतःचे स्थान फार बदलत नाही. या वेळेत अन्न पदार्थ शिजवून तयार होतात.

आरशाची वैशिष्ट्ये

 • या पाकळ्यांची मापे अशी आहेत की ज्या जोडल्याने सपाट पृष्ठभागाचा वापर करून परवलयाकृती (paraboloid) त्रिमित आकार तयार होईल. या आकाराचे वैशिष्ट्य म्हणजे यावर समोरून पडणारे सूर्य किरण एकत्र होऊन त्याच्या केंद्रस्थानी येतात. या केंद्रावर आपण आपले शिजवण्याचे पदार्थ ठेवायचे आहेत. एकत्रित किरणांमधे असलेली ऊर्जा आपले पदार्थ लौकर शिजवते.
 • मोठ्या आकाराचे आरसे वापरले तर मोठ्या प्रमाणात अन्न शिजवता येईल.
 • हे आरसे शेतावर, शाळांत खिचडी शिजवण्यासाठी , विविध शिबिरांमधे वापरता येतील. इंधनाची बचत होण्यासाठी ते फार उपयुक्त ठरेल.
 • कोणता पृष्ठभाग वापरून पाकळ्या बनवल्या आहेत त्यावर आरशाचा दणकटपणा, वजन व किंमत अवलंबून आहे.
 • प्रत्येक पाकळी बनवण्यासाठी पुढील मोजमापे बिनचूक वापरणे उपयुक्त व गरजेचे ठरेल.
पाकळी उंची (ring boundary)
रूंदी (width of the sector)
45.94 6.98
39.82 6.21
34.04 5.43
28.55 4.65
23.34 3.88
18.36 3.1
13.59 2.33
8.97 1.55
4.46 0.78
0 0

विज्ञान केंद्राचा मुक्त प्रकल्प वापरून तुम्हाला सूर्यचुलीचा हा आरसा बनवता येतो.

 

शब्दशक्ती

पेटी पद्धतीची सूर्यचूल अनेक ठिकाणी वापरली जाते. ती उपयुक्त आहेच. पण तिला खूपच मर्यादा आहेत.

View original post 427 more words

मुक्त संगणक प्रणाली – २

उगम कार्यक्रम खुला असण्याचे फायदे

मागच्या लेखात आपण असं पाहिलं की मुक्त संगणक प्रणालीची खरी शक्ती, लेखकांनी मुक्त केलेल्या उगम कार्यक्रमात आहे.

हा उगम कार्यक्रम आम्हाला समजत नाही त्यामुळे मुक्त प्रणालींचं आम्हाला महत्व का वाटावं, असं अनेकांचं म्हणणं असतं.  हा उगम कार्यक्रम कोण समजून घेऊ शकतो ? याचं उत्तर असं आहे – लिहिता वाचता येणारं कोणीही !

मात्र त्यासाठी तो समजून घेण्याची इच्छा, वेळ आणि कष्टाची तयारी या गरजेच्या गोष्टी आहेत. समजा या तीनही गोष्टी तुमच्या कडे नसतील आणि यातलं आपल्याला काय समजणार, अशी भीती मनात असेल तर तुमचा असा मित्र/मैत्रिण गाठा की जी हे करू शकते. ती कदाचित इंजिनियर असेल, कॉंप्यूटर क्षेत्रातली जाणकार व्यक्ती असेल.  विज्ञान क्षेत्रातील तज्ञ असेल. माझ्या माहितीत काही डॉक्टरही (रोग्यांना औषध देणारे) असे आहेत की जे यात रस घेऊन काम करतात.

उगम कार्यक्रम खुला करण्याच्या या अटी मुळे केवळ संगणकीय प्रणालीच मुक्त झाल्या आहेत असं नाही, तर त्या वापरल्यामुळे आपणही (खाजगीपणा जाण्याच्या) भीतीतून मुक्त होतो.

सा विद्या या विमुक्तये

मुक्त उगम कार्यक्रम अनेकांना मुक्त करतात.  ही मुक्तता मिळालेल्यात प्रथम येतात संगणकशास्त्राचे विद्यार्थी. गल्लोगल्ली असलेल्या संगणकशास्त्राच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा दर्जा यथातथाच आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याचं महत्वाचंं कारण म्हणजे चांगली प्रणाली कशी लिहायची असते हे  त्या विद्यार्थ्यांना कधी पहायलाच मिळालेलं नाही. केवळ मुक्त प्रणालीच ही अडचण सोडवू शकते. खुले उगम कार्यक्रम पाहून, वाचून, समजून घेऊन हे विद्यार्थी जाणकार होऊ शकतात. आणि जाणकाराकडेच असते निर्मितीची शक्ती.

मुक्त प्रणाली, मूळ उगम कार्यक्रमात आपल्या गरजे नुसार बदल करण्याचं स्वातंत्र्यही देते. त्याचा वापर करून विद्यार्थी त्यांच्या गरजे प्रमाणे नव्याने प्रणाली विकसित करू शकतात.

अनेक पदव्या घेतल्यावरही काहीच निर्माण न करता येणारे आपल्या भारत देशात प्रचंड संख्येने आहेत. त्यामुळेच ते बेकारीच्या भीतीच्या छायेत सतत वावरत असतात. या भीतीतून विद्याच त्यांना मुक्त करू शकते केवळ पदवी नव्हे. विद्या प्राप्त करून घेण्याची संधी मुक्त प्रणाली देत असते. “सा विद्या या विमुक्तये” या संस्कृत अवतरणाचा अर्थ तोच आहे.

उगम कार्यक्रम खुला केल्यामुळे आणखी एक फायदा होत असतो. या कार्यक्रमात थोडा फरक केल्यामुळे नव्या सोयी असणारी प्रणाली पटकन निर्माण करता येते. त्यामुळे नव्या प्रणाली मुळापासून लिहाव्या लागत नाहीत आणि वेळ वाचतो. मुक्त प्रणाली वापरल्यानं चाकाचा शोध आपल्याला पुन्हा पुन्हा लावावा लागत नाही. (“We don’t have to re-invent the wheel”).

शब्दे वाटू धन जन लोकां

मुक्त संगणक प्रणालीचं वैशिष्ट्य केवळ उगम कार्यक्रम खुला करणं इतकंच नाही. तर मूळ प्रणालीच्या बदललेल्या अनेक आवृत्ती लोकांना वितरितही करता येतात यात आहे.

संगणकशास्त्राच्या वर्गात कोणी एकानं लिहिलेल्या प्रणालीचा उगम कार्यक्रम, त्यानं सर्वांना वाटलाच पाहिजे असा नियम असायला हवा. त्यामुळे मुक्त प्रणालीचे फायदे विद्यार्थीदशेपासूनच सगळ्यांना कळतील. हे कॉपी करणं नाही का होणार ? हो होईल ! पण ते वाईट असेल असं नाही. ते सहकार्याची भावना वाढवेल आणि कमी वेळात नव्या सोयी निर्माण करण्याचं स्वातंत्र्य आणि संधी प्रत्येक विद्यार्थ्याला देईल. शिवाय मूळ प्रणाली मधे छोटे छोटे बदल केलेल्या अऩेक प्रणाली निर्माण होतील.

आई आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करते. ती जेव्हा एखादा नवा पदार्थ तयार करते त्यावेळी तो तयार करण्याची कृती आपल्या मैत्रिणीला, शेजारणीलाही सांगते. उत्पादक आणि ग्राहकांमधे इतके साधे सरळ संबंध निर्माण करण्याचं श्रेयही सॉफ्टवेअर क्षेत्रात मुक्त प्रणालींना जातं.

आपण पिढ्यान् पिढ्या वेगवेगळे पदार्थ खात आलो. अगदी कोणती वनस्पती, भाजी म्हणून खाण्यायोग्य आहे- विषारी तर नाहीना, हे ठरवण्यासाठीही काही शतकांपूर्वी कोणीतरी धोका पत्करला होता. काहींनी एखादा पदार्थ अधिक चवदार बनवला, काहींनी मसाल्यांचा शोध लावला. आणि मुख्य म्हणजे ही प्रक्रिया, माहिती त्यांनी आपल्या शेजाऱ्यांपासून दडवली नाही. ती मुक्त केली. म्हणून आपण आज पोषक, चवदार जेवण जेवू शकतो. मानव जातीचा भविष्यकाळ सुखदायी व्हावा म्हणून मुक्त प्रणाली ही भूमिका आज बजावत आहेत.

शब्दशक्ती

उगम कार्यक्रम खुला असण्याचे फायदे

मागच्या लेखात आपण असं पाहिलं की मुक्त संगणक प्रणालीची खरी शक्ती, लेखकांनी मुक्त केलेल्या उगम कार्यक्रमात आहे.

View original post 535 more words

मुक्त संगणक प्रणाली -१

विज्ञान केंद्र मुक्त संगणक प्रणालीचा पुरस्कार करते. (मुक्त संगणक प्रणालींबद्दल अधिक माहितीसाठी ही विज्ञान केंद्र निर्मित पुस्तिका वाचा.) जी.एन्.यू. लिनक्स हे त्याचे सर्वात महत्वाचे उदाहरण आहे. पण त्याखेरीज इतर मुक्त प्रणालीही अस्तित्वात आहेत. आम्ही मुक्त संगणकीय प्रणालींचाच पुरस्कार का करतो असा अनेकांना प्रश्न पडतो. त्याचं सर्वात महत्वाचं उत्तर म्हणजे या प्रणाली संगणकाच्या वापरकर्त्याला मुक्त ठेवतात. जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी विंडोझ प्रणाली ही वापरणाऱ्यांना कोणतेही स्वातंत्र्य देत नाही. इतकंच नव्हे तर त्यांचं स्वातंत्र्य काढून घेेते.

स्वातंत्र्य-कुठे स्वातंत्र्य-कुणा स्वातंत्र्य ?

कविवर्य वसंत बापटांच्या कवितेतली ही ओळ छान आहे. पण….
संगणकाची एखादी प्रणाली वापरण्याचा आणि स्वातंत्र्याचा संबंधच काय ?
कुणाचं स्वातंत्र्य कोणी काढून घेतलं होतं, कोणी मिळवून दिलं ?
हे स्वातंत्र्य इतकं महत्वाचं आहे का ?
काही दिवसांपूर्वी अशाच विषयावर एका सभेत बोलल्यावर एक तरूण मुलगा मला नंतर येऊन भेटला. मला म्हणाला, तुमच्या भाषणातले अनेक मुद्दे कळले पण तुम्ही वर्णन केलेल्या संगणकीय पारतंत्र्याची दाहकता नाही कळली !

आपण भारतीय लोक एकमेकांवर फार अवलंबून असतो. आपल्या कुटुंबावर, शेजाऱ्यावर, गल्लीतल्या लोकांवर, जातीवर, समाजावर आणि देशावर. त्यामुळे आपल्याला व्यक्तिगत स्वातंत्र्याची महती समजलेलीच नाही.  ती एकदा समजली की मग ही दाहकता कळून येईल.

हा लेख आपल्यापैकी अनेकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात स्थान मिळवून बसलेल्या संगणकासंबंधातल्या स्वातंत्र्या बद्दल आहे. त्या स्वातंत्र्याच्या महत्वाबद्दल आहे.

संगणकीय स्वातंत्र्याची चार कलमे

 1. कोणत्याही कारणासाठी कितीही संगणकांवर ती प्रणाली वापरण्याचे स्वातंत्र्य. (तुम्ही जेव्हा विंडोझ वा तत्सम अमुक्त प्रणाली वापरता त्यावेळी प्रत्येक संगणकासाठी ती वापरण्याचे वेगळे लायसेन्स फी भरून तुम्हाला घ्यावे लागते.)
 2. या प्रणालीचा उगम (सोर्स कोड) पाहून अभ्यासण्याचे स्वातंत्र्य. उगमात बदल करून प्रणाली इतर कोणत्याही वेगळ्या कारणासाठी वापरण्याचे स्वातंत्र्य. या सगळ्यासाठी मुक्त प्रणाली लिहिणाऱ्यांनी त्याचा उगम सर्वांसाठी खुला केलेला असलाच पाहिजे.
 3. या प्रणालीच्या नकला करून त्या इतरत्र वितरित करण्याचे स्वातंत्र्य. या मुळे तुम्ही तुमच्या मित्रांना – शेजाऱ्यांना मदत करू शकता.
 4. मूळ प्रणालीत तुम्ही बदल केल्यानंतर या नव्या रूपातल्या प्रणालीच्या नकला इतरत्र वितरित करण्याचे स्वातंत्र्य. त्यामुळे तुम्ही केलेला बदलही इतरांपर्यंत जाऊन पोहोचतो. यासाठी तुम्ही बदल केलेला उगम या नकला बरोबर उपलब्ध करून देणे अनिवार्य ठरते.

बंधनात टाकणाऱ्या प्रणाली

तुम्हा आम्हाला बंधनात टाकणाऱ्या प्रणाली वर लिहिलेल्या एकाही स्वातंत्र्याचा लाभ देत नाहीत. याचा अर्थ काय ते आधी पाहूया.

कोणतीही संगणकीय प्रणाली लिहिण्यासाठी आधी

 • तिचा सोर्स कोड (उगम कार्य-क्रम) तयार करावा लागतो.
 • तो लिहिल्यावर कंपाइल केला जातो.
 • तेव्हा त्याचे रूपांतर असे होते की संगणक त्याचा वापर करू शकतो. याला एक्झिक्यूटेबल (संगणकीय वापरायोग्य) फाइल असे म्हणतात.
 • आपण जेव्हा ही फाइल संगणकावर चालवतो तेव्हा आपल्याला अपेक्षित काम संगणकाकडून केले जाते.

तुमच्या असं लक्षात येईल की उगम कार्यक्रम हा या पायऱ्यांमधला सर्वात महत्वाचा भाग आहे. उगम कार्यक्रम माणसेच तयार करतात. नंतर त्याचे रूपांतर संगणकामार्फतच वापरायोग्य फाइलमधे केले जाते. एकदा का वापरायोग्य फाइलमधे हे रूपांतर झाले की ती फाइल माणसांना थेट वाचून समजत नाही. पण उगम कार्यक्रम मात्र वाचून समजून घेता येतो. अमुक्त प्रणालींचे निर्माते केवळ अशा फाइल्सच तुमच्या पर्यंत पोचवतात.

कोणतीही अमुक्त प्रणाली कधीही उगम कार्यक्रम वापरकर्त्याला उपलब्ध करून देत नाही. तुम्ही असे विचाराल की मला कुठे उगम कार्यक्रम वाचून समजतो ? आणि समजला तरी त्याचे मी काय करू ?
तुम्हाला स्वतःला जरी हा उगम समजला नाही तरी तुमच्या कोणा मित्र मैत्रिणीला हा समजू शकेल आणि अपेक्षित कार्याशिवाय एखादे गुप्त कार्य ही प्रणाली तुम्हाला अज्ञानात ठेऊन करते आहे का याचा शोध लागेल. पण असे गुप्त (आणि दुष्ट) काम केले जाते का ?
होय असे केले जाते ! तुम्हाला माहिती असलेला संगणकीय व्हायरस हे त्याचे एक उदाहरण आहे. असा व्हायरस तुमच्या एखाद्या नेहमीच्या वापरतल्या (उदा. वर्ड प्रोसेसर) प्रणालीला चिकटतो आणि स्वतःचा दुष्ट कार्यभाग साधतो. पण जर वर्ड प्रोसेसरचा उगम उपलब्ध झाला तर अशा प्रणालीला व्हायरस चिकटू नये याची आधीच काळजी घेता येते.

इंटरनेट एक्सप्लोअरर या मायक्रोसॉफ्टच्या ब्राउजरला असे अनेक जंतू चिकटतात असे सिद्ध झाले आहे. या जंतूंमुळे तुमच्या संगणकावरील माहिती इंटरनेटद्वारे पळवली जाते. शिवाय हा जंतू बाहेरून चिकटला आहे, का मूळ उगमातच अंतर्भूत आहे हा संशय शिल्लक राहतोच. मायक्रोसॉफ्ट आपला कोणताही उगम कार्यक्रम उघड करत नाही. म्हणून त्यांच्या सर्व प्रणाली अमुक्त (आणि धोकादायक) आहेत असे म्हणता येईल.

मुक्त प्रणाली आपला उगम कार्यक्रम इंटरनेटवर जाहीर करतात. तो सतत अनेक तज्ञांच्या देखरेखीखाली असतो. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच.

आज आपण संगणकीय युगात वावरत आहोत. उच्चशिक्षित व्यक्ति पासून ते अक्षरओळखही नसलेल्या माणसापर्यंत (भ्रमणध्वनी मधे संगणकच असतो.) प्रत्येक जण संगणक मोठ्या प्रमाणात वापरतो. या प्रत्येक संगणकात जर मुक्त प्रणाली वापरली गेली तर माणसाचा खाजगीपणा जपला जाईल आणि बडे भैय्या आपल्यावर  सतत नजर ठेवू शकणार नाहीत. बहुचर्चित स्मार्ट-सिटी मधील स्मार्ट यंत्रणांपासून ते  मतदान यंत्रांपर्यंत प्रत्येकात लहानसे पण ताकदवान संगणक वापरले जातात हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यातली प्रत्येक प्रणाली मुक्त असायला हवी ही मागणी आपण केली पाहिजे.

मुक्त प्रणालींनी देऊ केलेल्या इतर स्वातंत्र्याचे फायदे पुढच्या लेखात वाचा…

शब्दशक्ती

मी मुक्त संगणक प्रणालीचा पुरस्कर्ता आहे. (मुक्त संगणक प्रणाली म्हणजे काय ?) जी.एन्.यू. लिनक्स हे त्याचे सर्वात महत्वाचे उदाहरण आहे. पण त्याखेरीज इतर मुक्त प्रणालीही अस्तित्वात आहेत.

View original post 693 more words