मायक्रो कंट्रोलरचे विश्व- प्रकरण १

विषयाची ओळख

शेती पासून कारखान्यांपर्यंत आणि घरगुती उपकरणांपासून ते व्यक्तिगत यंत्रणांपर्यंत मायक्रो कंट्रोलर आपले आयुष्य सुखी करतो आहे. या इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आपल्याला नव्या गोष्टींची निर्मिती करायची प्रेरणा देतात, कारण या यंत्रणा बनवणे आता फार महाग राहिलेले नाही.

मायक्रो कंट्रोलर सर्वदूर पसरण्याच्या या प्रक्रियेत मुक्त संगणकीय प्रणालींचा मोठा हातभार आहे. या प्रणाली सर्वांना सहज आणि मुक्तपणे उपलब्ध असल्यामुळे विकसन आणि निर्मितीच्या खर्चात मोठी कपात झाली आहे. आर्डुइनो सारख्या संगणकीय भाषांचा विकास सामान्य माणसालाही या क्षेत्रात उडी घ्यायला प्रवृत्त करतो.

ज्या व्यक्तीला अंकगणिताचे चांगले ज्ञान आहे आणि नवे शिकण्याची ओढ आहे अशी कोणीही व्यक्ती मायक्रो कंट्रोलर शिकू शकते. विद्युत मंडलांविषयीचे (इलेक्ट्रिक सर्किट्सचे) ज्ञान असेल तर अधिक किचकट यंत्रणाही अशा व्यक्तीला मायक्रो कंट्रोलर वापरून बनवता येतील.

पुस्तकाचा उद्देश

या पुस्तकात मायक्रो कंट्रोलर कसे काम करतो या पासून ते मायक्रो कंट्रोलर वापरून लहान मोठ्या यंत्रणा कशा विकसित करता येतील येथपर्यंत विविध विषय हाताळले जातील. इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्राची थोडी फार माहिती असणाऱ्यांना हा विषय लौकर समजेल. पूर्ण नव्या विषयाची ओळख करून घ्यायची असेल तर मात्र काही मूलभूत संकल्पना माहिती करून घ्याव्या लागतील. या संकल्पना देखील याच पुस्तकात, परिशिष्टातील माहिती वाचून वाचकांना समजावून घेता येतील.

हे पुस्तक मराठीत लिहिण्याचे महत्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील शेकडो अभियांत्रिकी महाविद्यालयांत असणारे विद्यार्थी व प्राध्यापक. इतके खोलवर अभ्यास करणारे तांत्रिक लेखन मराठीत वाचायला मिळाले तर या महत्वाच्या, व्यावहारिक उपयुक्तता असलेल्या विषयाची गोडी तरुणांमधे निर्माण होईल अशी खात्री वाटते.

या पुस्तकासाठी ए.व्ही.आर. या मायक्रो कंट्रोलरची निवड केली आहे. घटकांची बाजारातील सहज उपलब्धता, या विषयीची इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात असलेली डेटा शीट्स, आर्डुइनो सारख्या प्रणाली आणि हार्डवेअरची लोकप्रियता (आर्डुइनो AVR मायक्रो कंट्रोलर मध्यवर्ती मानूनच निर्मिला आहे.), यंत्रणांच्या विकसनासाठीची मुक्त (आणि मुफ्त) संगणकीय प्रणाली या शिवाय अत्यंत शक्तिशाली असणाऱ्या विविध AVR चिप्सची मालिका तुलनेने कमी खर्चात मिळणे ही कारणे यामागे आहेत.

हे पुस्तक वाचून, समजून घेऊन, मग अल्प खर्चात प्रयोग करून, नव्या नव्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणा निर्माण करणे शक्य होईल असा विश्वास वाटतो. तसे झाले तर ते या पुस्तकाचे खरे यश असेल.