मायक्रो कंट्रोलरचे विश्व- प्रकरण १

मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय ?

मायक्रो कंट्रोलरचे मराठीत शब्दशः भाषांतर, सूक्ष्म नियंत्रक असे करता येईल. पण त्याने विषयावर फारसा प्रकाश पडेल असे नाही. त्यासाठी अत्यंत साध्या शब्दांत या यंत्रणेची थोडक्यात ओळख करून घेऊ या.

एक अशी डिजिटल इलेक्ट्रॉनिक यंत्रणा जी

  • अनेक सूक्ष्म सूचनांचे तंतोतंत पालन करते.
  • या सूक्ष्म सूचना विशिष्ट क्रमाने अमलात आणते.
  • अपेक्षित काम पूर्ण करते.

त्या यंत्रणेला मायक्रो कंट्रोलर म्हणतात.

इलेक्ट्रॉनिक चिप अनेकांनी पाहिलेली असते. अनेक पाय असणाऱ्या गोम या कीटकासारखा दिसणारा हा काळा घटक अनेक इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या सर्किट्समधे पाहता येईल. मात्र असे दिसणारे सर्वच घटक मायक्रो कंट्रोलर असतात असे नाही. वरील छायाचित्र पहा. या चित्रात ATMEGA8 हा AVR-मायक्रो कंट्रोलर दाखवला आहे. मायक्रो कंट्रोलरच्या चिपमधे अत्यंत किचकट अशा अनेक इलेक्ट्रॉनिक सर्किट्सचा अंतर्भाव असतो. या पुस्तकात उदाहरणादाखल ATMEGA8 या मायक्रो कंट्रोलरचा अभ्यास केला आहे. अनेक पिना असलेल्या या घटकाच्या आत कोणती यंत्रणा असते हे आपण आता पहाणार आहोत.

ATMEGA8 चिप बद्दल

ATMEGA8 हा मायक्रो कंट्रोलर अतिशय प्रभावी समजला जातो. मात्र त्याच ATMEGA मालिकेतले पुढील कंट्रोलर अधिकच प्रभावी म्हणजे अधिक प्रोग्राम मेमरी,तात्पुरती मेमरी, पिनसंख्या असणारे, पण सोयी बहुतांशी ATMEGA8 प्रमाणेच आहेत.

वरील चित्रात दाखवलेली चिप निरखून पाहिली तर त्या चिपच्या डाव्या बाजूला एक अर्धगोलाकार खड्डा दिसेल. हा खड्डा डाव्या बाजूला ठेवून खालच्या बाजूने प्रत्येक पिनला क्रमांक दिले तर डाव्या बाजूची खालची पिन क्रमांक एकची पिन म्हटली जाते. त्यानंतर हा क्रम घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (१ ते १४ पिनांसाठी डावीकडून उजवीकडे, १४ ते २८ पिनांसाठी उजवीकडून डावीकडे) वाढत जातो. व खड्ड्याच्या वरच्या बाजूची शेवटची पिन २८ क्रमांकाची असते. (ATMEGA मालिकेतल्या काही चिप्स जास्त पिन असणाऱ्याही असतात. उदा. ATMEGA8535 ही चिप ४० पिना असलेली आहे. तिचे पिन क्रमांकही अाधी सांगितलेल्या पद्धतीनेच मोजले जातात.)