क्रोध आवरा आरोग्य मिळवा

मी आज येथे ” शत्रू कोण ?” हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.” षड्रिपू ” हा शब्द तुम्ही ऐकला असावा.ज्यांना हा शब्द माहीत नाही त्यांच्यासाठी त्या शब्दाची फोड करून सांगत आहे.” षट् ” म्हणजे सहा आणि ” रिपू ” म्हणजे   ” शत्रू “. आपल्या मन व अनुषंगाने शरीराचे जे सहा शत्रू असतात.त्यांना ” षड्रिपू “असे म्हटले जाते.

ते खालील प्रमाणे १) काम २)क्रोध ३) लोभ ४)मद  ५)मोह  ६)मत्सर हे आहेत. ह्या सहांमुळे मानवाचे मन वाईट होऊन त्याच्या शरीराला ते त्रासदायक ठरते. म्हणून प्रत्येकाने ह्या ” षड्रिपू ” म्हणजे सहा शत्रूंपासून विचारपूर्वक,नेहमी लांब राहिले पाहिजे.त्यांना लांब ठेवले पाहिजे.

क्रोध म्हणजे ‘ राग ‘, ‘ रागावणे ‘. आपण उगाच किंवा हेतुपुरस्सर कुणावरही,अकारण किंवा कारण असताना (आपल्याला तसे वाटते म्हणून ) रागावत असतो.  ते पूर्णतः चुकीचे आहे.  कारण या क्रोधाने,रागाने शरिरामध्ये अनावश्यक अशी उष्णता निर्माण होत असते. ती शरिरातील सूक्ष्म पेशींना त्रासदायक ठरते. त्यांना हानी पोहोचू शकते. त्यातून वेगवेगळे आजार निर्माण होतात. त्यामुळे जो रागावलेला असतो त्यास चक्कर येणे,डोके दुखणे,भोवळ येणे,उलट्या होणे, इ.इ. थोडावेळ  राहणारी लक्षणे निर्माण होऊ शकतात. खूप दिवस राहणारी लक्षणेंही शरिरात दिसून येतात. कधी कधी तर मरेपर्यंत काही त्रास,आजार राहतात. सर्वांना माहीत असलेला आजार म्हणजे पॅरालिसीस. त्यामुळे क्रोधावर म्हणजेच रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे.

” रागावणे ” ही क्रिया त्वरित,क्षणात घडणारी असते. त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे खरोखर खूप अवघड .परंतु रोज सकाळी उठल्यावर मनाशी पक्के ठरवावे. मी कोणावरही रागावणार नाही. मी माझ्यावरही रागावणार नाही. मी मनातल्या मनात किंवा स्पष्टपणे कोणावरही राग काढणार नाही.  हे लक्षात ठेवून दर अर्ध्या तासाने आपण आपणास शाबासकी द्यावी की मागच्या अर्ध्या तासात मी कोणावरही रागावलो नाही. अशी सवय झाली पाहीजे आणि रागाला येण्याला आपल्याला मनाई करता आली पाहिजे. डोळे वटारणे,हात उगारणे,अंगावर धावून जाणे रागावून कुठलीही हालचाल करणे इत्यादी प्रकारे होणाऱ्या शरीराच्या  क्रिया टाळण्याची सवय होऊ लागते.

जो रागावर नियंत्रण ठेवतो तो जास्त सुखी राहू शकतो हे सत्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. जगात चांगल्या गोष्टी करण्यासाठी जरा जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे कंटाळून न जाता रागावर नियंत्रण ठेवण्याचा ज्याने-त्याने प्रयत्न करावा . त्यामुळे होणारी शारीरिक आणि मानसिक त्रासादि लक्षणे,आजार यांना सहज टाळता येऊ शकते.” शुभस्य शीघ्रम |” या न्यायाने आत्ता लगेच मनात ठरवावे. मी पुढील अर्धा तास नक्कीच कोणावर रागावणार नाही. अशी चांगली सुरुवात झाली की पुढे आयुष्यभर आनंद मिळेल, तुम्हाला आणि दुसऱ्याला. औषधाविना आरोग्य टिकविण्यास खूप मदत होईल.

डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.